चार गझलसंग्रहांचे पुण्यात एकाच वेळी प्रकाशन, शनिवारी रंगणार सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेच निखारे धरतो हाती ज्यांच्या हृदयी केवळ खदखद.. फक्त फुले वेचावी इतकी आवड माझी सवंग नाही.. ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य यांचा हा परखड शेर. त्यांच्यासह महाराष्ट्रातील गझलकारांचे चार संग्रह एकाच वेळी पुण्यात प्रकाशित होणार आहेत. शनिवार 11 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नवी पेठ येथील निवारा हॉलमध्ये हा सोहळा रंगणार असून राज्याच्या विविध भागांतून नामवंत मराठी शायर उपस्थित राहणार आहेत.

चौकोनी अंबर (भूषण कुलकर्णी, कॅलिफोर्निया), एक कहाणी वाऱयावरची (अश्विनी आपटे, पुणे), विजांचा सोयरा (प्रशांत वैद्य, पुणे), तेच निखारे धरतो हाती (प्रातिनिधिक) अशी या गझलसंग्रहांची नावे आहेत. पुण्यातील गझल शाळा या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला आहे.

रंग माझा वेगळा

या प्रकाशन सोहळय़ानंतर निवडक गझलकारांचा ‘रंग माझा वेगळा’ हा मुशायरा होणार आहे. त्यात प्रशांत वैद्य, प्रमोद खराडे, अश्विनी आपटे, भूषण कुलकर्णी, मधुरा गावकर, कांचन कानतोंडे, अभिषेक बोरगावकर, दुर्वेश पलुस्कर, नेतराम इंगळकर, सुयोग पंडित सहभागी होणार आहेत.