
सामना ऑनलाईन । जयपूर
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नृत्याने लाखो प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे विख्यात नृत्यगुरू क्वीन हरीश यांचा रविवारी भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला. जोधपूरच्या बिलाडाजवळ एका ट्रकने क्वीन हरीश यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यात क्वीन हरीश यांच्यासह 4 कलाकारांचाही मृत्यू झाला.

रविवारी एक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नृत्यगुरू क्वीन हरीश हे आपल्या सहकलाकारांसह जात होते. याच दरम्यान जोधपूरच्या बिलाडाजवळ एका ट्रकने क्वीन हरीश यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यात क्वीन हरीश यांच्यासह गाडीतील अन्य कलाकारांचाही मृत्यू झाला. क्वीन हरीश यांच्या अपघाती मृत्यूमुळे जैसलमेरवासियांनी हळहळ व्यक्त केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही क्वीन हरीश यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. फक्त जैसलमेर नाही तर संपूर्ण राज्यासाठी ही दु:खद घटना आहे. क्वीन हरीश यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून दिली.
जोधपुर में हुए भीषण सड़क हादसे में ख्यातनाम कलाकार हरीश कुमार उर्फ़ क्वीन हरीश सहित चार लोगों की दर्दनाक मृत्यु बेहद दुखद है। #Rajasthan की लोक कला संस्कृति को समर्पित हरीश ने विशेष शैली में नृत्य कला से #Jaisalmer को एक अलग पहचान दी।उनका निधन लोक कला क्षेत्र में एक बड़ी क्षति है pic.twitter.com/M5qDQplWrw
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 2, 2019
कोण आहेत नृत्यगुरू क्वीन हरीश?
राजस्थानच्या जैसलमेर येथील विख्यात नृत्यगुरू क्वीन हरीश यांनी आतापर्यंत 5 हजार पेक्षा जास्त कलाकारांना राजस्थानी संगीत आणि हिंदुस्थानी लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. राजस्थानी नृत्यामध्ये घुटना, चकरी, भवाई, तराजू, तेरह ताली, घूमर, चरी, कालबेलिया हे प्रसिद्ध प्रकार आहेत आणि क्वीन हरीश यामध्ये पारंगत होते. हे नृतप्रकार क्वीन हरीश यांनी जगभरातील 60 देशांमध्ये पोहोचवले आहेत. यासाठी त्यांचा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊनही सन्मान करण्यात आला. त्यांनी देश-विदेशात नृत्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. तसेच चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.




























































