फ्रान्स- नीस शहरातील हत्यांनंतर इस्लामविरोध तीव्र, नागरिकांची रस्त्यावर निदर्शने

फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या तीन जणांच्या निर्घृण हत्यांनंतर फ्रान्समध्ये धार्मिक तेढ तीव्र झाली आहे. या घटनेनंतर फ्रान्सचे नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नीस येथील नोत्र दॅम चर्चमध्ये तीन जणांची हत्या करण्यात आली. ट्युनेशियन वंशाचा एक माणूस हातात चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला आणि त्याने एका महिलेची गळा चिरून हत्या केली. तिच्यासोबत अन्य दोन जणांचीही त्याने हत्या केली. त्याच्या हातात चाकूसोबत कुराणाची प्रत असल्याचं तसेच तो अल्लाहू अकबर असं ओरडत चर्चमध्ये घुसला होता, असं तपासात उघड झालं आहे.

हा हल्लेखोर इटलीच्या मार्गाने फ्रान्समध्ये दाखल झाला होता. त्याला पोलिसांनी गोळी मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेला फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी इस्लामी दहशतवादी हल्ला म्हटलं आहे. या घटनेनंतर फ्रान्समधील सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या शहरात सात हजार सैनिक संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत.

या हत्यांचा विरोध करण्यासाठी नीस शहरातील नागरिक गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असल्यामुळे त्यांनी नोत्र दॅम चर्चजवळ रॅली काढून मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसंच इसिस या दहशतवादी संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी फ्रान्सचं राष्ट्रगीतही गायलं. या दरम्यान अनेक जण इस्लाम युरोपातून परत जा अशा घोषणाही देत होते.

काही दिवसांपूर्वी फ्रान्समधील एका शिक्षकाची मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र काढल्याने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या या तीन हत्यांनी फ्रान्समध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या