ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा, अखेर 25.75 कोटींचा निधी मंजूर

हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडविणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कराड तालुक्यातील गोळेश्वर या खाशाबांच्या जन्मगावी होणाऱ्या या क्रीडा संकुलासाठी राज्य मंत्रिमंडळाने अखेर 25 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

खाशाबा जाधव यांनी 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले कांस्यपदक मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र आजकर खाशाबा जाधव यांचा यथोचित राष्ट्रीय सन्मान झाला नसल्याची सल कुस्तीप्रेमींमध्ये आहे. कारण गोळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणीसाठी राज्य शासनाने 30 जुलै 2009 मध्येच मान्यता दिली होती. त्यासाठी गोळेश्वर ग्रामपंचायतीने कराड तालुका क्रीडा संकुल समितीकडे जागाही कर्ग केली होती. या जागेकर क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तीन कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या 6 ऑगस्ट 2014 च्या आदेशान्वये एक कोटी रुपयांचा निधी वितरितही केला होता.

गोळेश्वर ग्रामपंचायतीने कुस्ती संकुलनासाठी 95 गुंठे जागा देत ती जागा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावे केली. यापैकी सद्यःस्थितीत 58 गुंठे जागा कुठे आहे, हेच समजत नाही, तर उर्वरित जागा शासनाच्या ताब्यात आहे. मागील वर्षी 14 ऑगस्टला तत्कालीन क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी कराड तहसीलदार कार्यालयात या विषयाकर बैठक घेऊन क्रीडा संकुलाचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी गोळेश्वरमध्ये जागामोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आता तेथील 58 गुंठे जागा लवकरच अतिक्रमणमुक्त होणार आहे.

15 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार!

पैलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलाच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता देऊन 25 कोटी 75 लाख रुपयांची घोषणा केली. त्यामुळे हे क्रीडा संकुल उभारणीची तब्बल 15 वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. या भव्य क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऍडमिन एरिया, किचन व डायनिंग स्कच्छतागृह, जिम, व्हीआयपी रूम, टीएम ‘ए’ क ‘बी’ रूम, ऑडिओ व्हिज्युअल रूम, फिल्ड ऑफ प्ले, मॅट, मुला-मुलींची डॉमेंट्री, टॉयलेट, 500 लोकांची आसनव्यवस्था असलेली प्रेक्षक गॅलरी या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

लबाडाघरचं आवताण…

ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधवांच्या गोळेश्वर या जन्मगावी होणाऱ्या क्रीडा संकुलासाठी राज्य मंत्रिमंडळाने सुरुवातीला तीन कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी एक कोटीचा निधी या जागेवर क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी वितरितही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर या क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी सात कोटी रुपयांच्या मागणीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आता या खाशाबांच्या नावाने होणाऱ्या क्रीडा संकुलासाठी 25 कोटी 75 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने जाहीर केला आहे, मात्र त्यासाठीचा ‘जीआर’ अद्याप निघालेला नाहीये. सध्या मिंधे सरकारने राजकीय घोषणांचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ‘लबाडाघरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नसतं’ अशी चर्चा आता क्रीडा वर्तुळात सुरू झाली आहे.