
राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये भेडसावणारी पाणीटंचाई आणि रखडलेले प्रकल्प याबाबत आमदार राजन साळवी यांनी अनेक वेळा तारांकित व विविध आयुधांद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. रखडलेल्या प्रकल्पांना निधी मंजूर होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश मिळाले असून त्यानुषंगाने राजापूर तालुक्यातील जांभवली, तुळसवडे, कोतापूर तर लांजा तालुक्यातील पालु, कोचरी (डफळेवाडी), लघु पाटबंधारे योजनांना निधी उपलब्ध होऊन प्रशासकीय मान्यता मिळून निविदास्तरावर कार्यान्वित आहे.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाद्वारे ही कामे चालू आहेत, परंतु महामंडळाला मुदतवाढ नसल्याने तसेच निधी उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे ठप्प होती. या प्रकल्पाबाबत ठेकेदारांची देयके तसेच आवश्यक निधीसाठी शासन तरतूद करून महामंडळाच्या 50व्या बैठकीमध्ये सदर योजनेची आवश्यकता तपासून नव्याने प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सदर योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन निधी उपलब्ध करून शासनस्तरावर मान्यता देण्यात आली.
आमदार राजन साळवी यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर लघु पाटबंधारे योजना दोनशे 13 कोटी 68 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून सदर प्रकल्पांनमुळे संघातील पाणीटंचाईला दिलासा मिळणार आहे.
























































