
आसावरी जोशी,[email protected]
येत्या 14 डिसेंबरला आपल्या गदिमांच्या अर्थात महाकवी ग. दि. माडगुळकरांच्या 14 लघुकथांचा इंग्लिश अनुवाद प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने ‘गदिमा’ या तीन महाक्षरांचा घेतलेला वेध..
50–60–70 ची दशकं ही मराठी साहित्य… चित्रपट… रंगभूमी साऱयाच माध्यमांत अभिजात शब्दांनी… कलेने… प्रतिभेने वासंतिक बहरलेली होती. एकापेक्षा एक प्रतिभावंत अहमहमिकेने आपले कलागुण रसिकांसमोर आणत होते… रसिक, श्रोते, वाचक, काया-वाचा-मनाने तृप्त होत होते. संगीतकार, दिग्दर्शक, अभिनेते यांच्या कलेला अभिजात साज चढत होता. गदिमांच्या सकस… बहुप्रसवा लेखणीचा… चित्रपट गीतं… बालगीतं… स्वानंदासाठी केलेल्या कविता… कथा… कादंबऱया… किती माध्यमांची नावं घ्यावीत… आई सरस्वतीचा प्रत्येक प्रांत गजानन दिगंबर माडगुळकर यांच्या तेजस्वी… सात्विक… खुमासदार लेखणीने उजळून निघत होता. भक्तिरस… शृंगाररस… प्रेमरस… वीररस… साऱया भावभावनांची अभिव्यक्ती गदिमांच्या लेखणीतून एकसंध पाझरत होती. 75 सालच्या नंतरची आमची पिढी तर या सारस्वतावरच पोसली गेली… सुसंस्कृत झाली. गदिमांच्या गाण्यातील प्रत्येक ओळ… प्रत्येक शब्द म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान आणि संस्कार… गीत रामायणाला आजतागायत प्रत्येक सुसंस्कृत घरातून वाल्मिकी रामायणाच्या बरोबरीने स्थान आहे.
आज पुन्हा एकदा गदिमांची लेखणी थेट जगाच्या पाठीवर निघाली आहे. इंग्लिश भाषेच्या माध्यमातून. गदिमांची गीतं, कविता, पटकथा या महाप्रचंड साहित्य संपदेपुढे त्यांच्या कथा, कादंबऱया, लघुकथा थोडय़ा झाकोळल्या गेल्या. पण प्रा. विनया बापट यांनी गदिमांच्या निवडक लघुकथा घेऊन त्याचा इंग्लिश अनुवाद केला आहे. येत्या 14 डिसेंबरला गदिमांच्या लघुकथांचे इंग्लिश पुस्तक प्रकाशित होईल. तसे पाहता गीत रामायण कधीचेच इंग्लिशमध्ये पोहोचले आहे, पण आता गदिमांच्या लघुकथांच्या रूपाने अस्सल मराठमोळे वातावरण, संस्कृती जगाच्या पाठीवर पाय रोवून उभी राहणार आहे. यावर विनयाताईंनी सांगितले की, दिवाळी अंकांसाठी गदिमांनी कथा लिहिल्या होत्या. त्यातून आम्ही 14 कथांची निवड केली. गदिमांचे सुपुत्र, आमचे स्नेही श्रीधर माडगुळकरांच्या साथीने आम्ही हा वसा उचलला. मराठीतील उत्तम साहित्य जगात पोहोचावे हा त्यामागचा उद्देश.
गदिमांच्या कथांचे भाषांतर करताना विनयाताईंनी भाषांतरातील मध्यम मार्ग निवडला. म्हणजे पूर्ण रूपांतरीत किंवा शब्दशः भाषांतराऐवजी दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारा कम्युनिकेट हा प्रकार निवडला आहे. त्यामुळे साहजिकच त्या काळचे मराठमोळे वातावरण, पात्र, प्रसंग जसेच्या तसे या अनुवादांत उतरले आहेत. पण येथे मुद्दामच विनयाताईंनी ग्रामीण बाजाच्या कथा थोडय़ा मागे ठेवल्या आहेत. या अनुवादानंतर आता विनयाताईंनी गदिमांच्या आत्मकथनाचा अनुवाद करायला घेतला आहे. येथे त्यांनी सांगितले की, मुळात एखाद्या अभिजात साहित्यकृतीचा अनुवाद करणं हे खूप अवघड असतं. पण आपल्याकडे नेहमीच इंग्लिश साहित्य अनुवादित होऊन येतं. मग आपलं साहित्य तर अगदी समृद्ध, संपन्न आहे. ते जागतिक दर्जाचे ठरावे म्हणून हा प्रयत्न.
स्वतः गदिमांनी कधी साहित्यनिर्मितीत कोणताही भेदाभेद मानला नाही. चित्रपट गीतं, अभंग, लावणी, कविता, कथा, पटकथा… सारस्वताचा असा एकही प्रांत नाही जेथे गदिमांच्या लेखणीने आपली मोहोर उमटवली नाही. खऱया अर्थाने जागतिक दर्जाचं हे अक्षरलेणं आज जागतिक सारस्वताला समृद्ध करायला निघालं आहे.
गजानन दिगंबर माडगुळकर.
अर्थात आपले गदिमा. जन्म छोटय़ाशा शेटेफळ गावातला. आपल्याकडे जन्माची द्विज ही संकल्पना आहे. पण गदिमा स्वतःला त्रिज म्हणायचे. कारण त्यांचा जन्म तीनदा झाला होता. माणदेशातील ऑक्टोबरमधील धुंवाधार पावसात जन्मलेल्या गदिमांना जन्मतःच मृत ठरवले होते. पण सुईणीने अखेरचा प्रयत्न म्हणून विस्तव तव्यावर घेऊन बाळाच्या नाभीपाशी नेला आणि बाळाने टाहो फोडला.
गणितामुळे गदिमा मॅट्रिक होऊ शकले नाहीत. चरितार्थासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकरांचे लेखनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साहित्याचा मूलभूत संस्कार इथूनच झाला असावा. कारण त्या निमित्ताने भरपूर पुस्तकं गदिमांना वाचायला मिळाली. खूप लिहावेसे वाटू लागले. त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला.
गदिमांचे महाकाव्य ‘गीतरामायण’ हे एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव अभूतपूर्व कार्यक्रम. रामायणात वाल्मीकींनी 28,000 श्लोकांत रामकथा लिहिली. गदिमांनी तीच रामकथा 56 गीतांमध्ये शब्दबद्ध केली.
‘गीतरामायणा’मुळे गदिमा आपल्या महाराष्ट्राचे वाल्मीकी झाले. ‘गीतरामायणा’नंतर तितकंच तोलामोलाचं ‘गीतगोपाल’ गदिमांनी लिहिलं. तसंच पेशवाईवर ‘गंगाकाठी’ नावाने काव्यकथाही लिहिली. अथर्वशीर्षाचे मराठी रूपांतर केवळ गदिमाच करू जाणे.
गीतकार गुलजार एके ठिकाणी गदिमांबद्दल म्हणतात की, मला ग. दि. माडगुळकर म्हणण्यापेक्षा गदिमा हेच नाव जास्त आवडतं. कारण गदिमा म्हटलं की ते मला ‘मां की गोद में’सारखं वाटतं.
शिर्डीच्या साईबाबांसमोर जी काकड आरती होते ती गदिमांच्या लेखणीतून उतरली आहे. यासाठी त्यांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतले होते. गदिमांनी स्वातंत्र्य लढय़ातही भाग घेतला होता. तेथेही त्यांनी वीरश्रीयुक्त कवनं रचली. तेव्हा ते शाहीर बोऱया भगवान झाले होते.अत्यंत लखलखती प्रतिभा असूनही गदिमांनी कोणत्याही साहित्य प्रकारात कधी भेदाभेद केला नाही. ‘जोगिया’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या मनोगतात ते लिहितात, ‘जीवन व्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग येतो. पण या संग्रहातील कविता मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे. म्हणूनच ती ‘जोगिया’ आहे.
गदिमांच्या कथेवर सुमारे 25 हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली. त्यात ‘दो आंखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’ यांचा समावेश आहे. गुरुदत्तच्या ‘प्यासा’ची मूळ कथा आणि अलीकडच्या अमिताभच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथा आपल्या गदिमांचीच.
गदिमांनी राजकारणासारख्या रूक्ष क्षेत्रातही मुक्त वावर केला. ते साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून जवळजवळ 12 वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य होते. ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करायचे तेव्हा विधानसभेतील अनेक आमदार गदिमांचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत.
ब्रह्मभट या हिंदी भाषिक कवीने गदिमांना त्यांचे शीघ्रकवित्व सिद्ध करायचे आव्हान दिले. त्यासाठी तीन ओळी त्यांच्यासमोर ठेवल्या.
रातभर रहियो – सवेरे चले जयियो
रातभर रहियो – सवेरे चले जयियो
मिलनेवालों के साथ क्या काम है जलनेवालों का?
गदिमा- रातभर रहावा… झुंजूरका तुम्ही जावा…
रातभर रहावा… झुंजूरका तुम्ही जावा…
शेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जीवांशी जळती कशाला?
इश्काचा मजा तुम्ही घ्यावा…
























































