अलोट गर्दीत काळभैरव देवाचा पालखी सोहळा, आज यात्रेचा मुख्य दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘भैरीच्या नावानं चांगभलं’च्या गजरात, गुलालाची उधळण व ढोल ताशांच्या निनादात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचा पालखी सोहळा आज सायंकाळी भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. मिरवणुकीने पालखी डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. उद्या (सोमवारी) यात्रेचा मुख्य दिवस आहे.

गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील मंदिरात पुजारी, मानकरी, प्रशासकीय अधिकारी व भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. या मिरवणुकीत मानाच्या पाटील, ढंगे-पाटील, किल्लेदार कुटुंबीयांच्या सासनकाठय़ा सहभागी झाल्या होत्या. पालखीमार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पालखीसमोरील सासनकाठय़ांना गोंडे बांधण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या मिरवणुकीत मोठे गोंडे आकर्षणाचा विषय ठरले.

महिला व ज्येष्ठ नागरिकांना पालखीचे सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. शिवाजी चौकातून पालखी नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव चौकातून काळभैरी रोडवरून डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. मध्यरात्री 12 वाजता श्री काळभैरव देवाची शासकीय पूजा झाली. पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

उद्या (सोमवारी) यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या भागांतून लाखो भाविक गर्दी करतात. सर्व भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रास्थळी जाण्यासाठी गडहिंग्लज आगाराने स्वतंत्र ठिकाणी जादा गाडय़ांची व्यवस्था केली आहे. यात्रास्थळीही तात्पुरते बस स्थानक उभे करण्यात आले आहे. सध्या शहरात महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडी लक्षात घेऊन त्या दृष्टीने वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन केले आहे.

वाहतूक मार्गात बदल

n यात्रेच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. कोल्हापूरकडून काळभैरीमार्गे येणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, ती ‘सनराइज’ हॉटेल, बहिरेवाडी, वडरगे गावातून वडरगे रोडने गडहिंग्लजकडे जाणार आहे. तसेच गडहिंग्लजमार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक लाखेनगर कमान, शेंद्री, हनिमनाळ, हिटणीमार्गे कोल्हापूरकडे वळविली आहे. त्याबरोबरच एकेरी मार्गांचाही वापर केला जात आहे. गडहिंग्लजमार्गे काळभैरव मंदिराकडे जाणारी वाहने वीरशैव चौक, हनुमान मंदिर, काळभैरी कमान, भैरी रोड, बडय़ाचीवाडी फाटा येथे जातील. या ठिकाणी एमआयडीसीत वाहनांच्या पार्ंकगची व्यवस्था करण्यात आली आहे. परत जाण्यासाठी एमआयडीसी, केदारी-रेडेकर रुग्णालय, शेंद्री रोड, औरनाळ फाटा, औरनाळ गावातून संकेश्वरकडे, तसेच मेटाचा मार्ग, कचरा डेपो, होंडा शोरूमकडून गडहिंग्लजकडे अशी एकेरी वाहतूक होणणार आहे.