
गौरी-गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांच्या ऑनलाइन बुकिंगला मोठा प्रतिसाद दिला आहे. रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने गणेशभक्त ‘लालपरी’कडे वळू लागले आहेत. शुक्रवारपर्यंत एसटीच्या मुंबई विभागातून 220 जादा गाड्यांचे बुकिंग फुल झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याचदरम्यान तांत्रिक कारणांमुळे जादा गाड्यांचे ग्रुप बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही. त्याची प्रतीक्षा मोठय़ा प्रमाणावर गणेशभक्त करीत आहेत.
गौरी-गणपती सणासाठी यंदा एसटीच्या 5220 जादा गाडय़ा मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिह्यात धावणार आहेत. या गाड्यांचे ऑनलाइन तसेच बस स्थानकांवर आरक्षण सुरू करण्यात आले आहे. रेल्वेच्या आरक्षणापासून अनेकजण वंचित राहिले आहेत. त्यामुळे गावागावात पोहोचण्यासाठी एसटीचा पर्याय गणेशभक्तांनी निवडला असून भाडेवाढीनंतरही एसटी गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल आगारातून 74, परळ आगारातून 88, कुर्ला येथून 47, पनवेल येथून 9 आणि उरण येथून दोन जादा गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहे. 12 सप्टेंबरला सर्वाधिक बुकिंग होत असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. कित्येक प्रवासी रेल्वे तिकिटाची प्रतीक्षा करून नंतर एसटीकडे वळतात. त्यामुळे उर्वरित जादा गाड्यांचे आरक्षणही लवकरच फुल होईल, अशी अपेक्षा एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
30 टक्क्यांची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी
एसटीच्या गाड्यांचे ग्रुप बुकिंग 10 ऑगस्टपासून सुरू करणार असल्याचे महामंडळाने जाहीर केले होते. मात्र तांत्रिक समस्येमुळे ग्रुप बुकिंग रखडले आहे. हे बुकिंग वेळीच सुरू करण्याबरोबर त्यावर लादलेली 30 टक्क्यांची भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघातर्फे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

























































