>> गणेश आचवल
सध्या महाराष्ट्रात, देशभरात अगदी परदेशातही मोठय़ा उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे. ढोलताशांच्या गजरात गणेशाचे आगमन होत आहे. या ढोलपथकांचे वारे आता परदेशात पोहोचले आहे. लंडनमधील बार्ंमगहॅम – सॉलीहल परिसरातील प्रसाद विष्णूपुरीकर, देवव्रत देसाई आणि हिरेन याग्निक या तिघांनी मिळून सात वर्षांपूर्वी ‘ढोल ड्रम्स’ हा ग्रुप सुरू केला. सुरुवातीला चार ढोल आणि दोन ताशे हिंदुस्थानातून मागवले आणि स्वतःचे ढोल पथक सुरू केले. प्रथम हे पथक फक्त बार्ंमगहॅममध्ये गणेशोत्सवाच्या वेळी ढोल वादन सादर करत होते. परंतु आता मात्र ‘ढोल ड्रम्स’ची प्रसिद्धी वाढली असून सातव्या वर्षांत अनेक ठिकाणी ते आपली कला गणपती उत्सवात सादर करत आहेत.
या वर्षी ते पाच ते सहा ठिकाणी आपली कला सादर करत आहेत. लंडनमधील हाउन्स्लो गणेशोत्सव मंडळात दोन तास गणपतीची मिरवणूक असते. थेम्स नदीत गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते. तसेच लॅमिंग्टन स्पा नावाच्या ठिकाणी तीनशे ते चारशे जण मिरवणुकीत सहभागी होतात. त्यातही आणि ‘कॉव्हेंट्री’ येथेसुद्धा ‘ढोल ड्रम्स’चा सहभाग आहे. लंडन येथील महाराष्ट्र मंडळ येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी या पथकाला बोलावण्यात आले आहे. आता ‘ढोल ड्रम्स’मध्ये वीस जण सहभागी असून दहा ते बारा ढोल आणि पाच ताशे अशा वाद्यांचा यात समावेश आहे. ‘पारंपरिक हात’ हा कलाप्रकारसुद्धा ते सादर करत आहेत.
प्रसाद विष्णूपुरीकर म्हणतो, ‘‘या पथकात माझी पत्नी श्रद्धा आणि इतर काही मुलीदेखील सहभागी आहेत. परदेशात राहूनही हिंदुस्थानी संस्कृती जपण्याचा आनंद खूप महत्त्वाचा असतो. पुढे आमचा ग्रुप असाच मोठा होऊन त्यात पन्नास ढोल, वीस ताशे असावेत, अशी आमची इच्छा असून तसे प्रयत्न चालू आहेत.’’