पाथरीत व्यापार्‍यांचे सोने लुटणारी टोळी मुद्देमालासह गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

पाथरी शहरात सोन्या-चांदीचे व्यापारी शेख सौरभअली शे. अजमतअली हे आपले दुकान बंद करून १२ लाख रुपयांचे सोने घेऊन घरी जात असताना अज्ञात चार व्यक्तींनी हातातील जबरीने बॅग हिसकावून सोने,चांदी व रोख रक्कम लंपास केल्या घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून चार आरोपींना १२ लाख २०० रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

पाथरी शहरात सोन्या-चांदीचे व्यापारी शेख सौरभअली शे. अजमतअली यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात पाथरीतील जि.प. शाळेतील मैदानाजवळ काही इसमांनी दुचाकीला कारची धडक देऊन दुचाकीवरील दोघांना खाली पाडून त्यांच्या जवळील सोन्या-चांदीची असलेली बॅग ज्यात १२ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केली असल्याची तक्रार केली होती. पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून दुचाकीवरुन जाणार्‍या दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले. कृपानसिंग टाक, रुपसिंग टाक या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली. यामध्ये पाथरी येथील गुन्ह्याची कबुली दिली. हा प्रकार पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील गौतम आदमाने आणि परभणी तालुक्यातील आर्वी येथील प्रताप मधुकर मस्के  यांनी संगनमत करुन एक कार दुचाकीचा वापर केला असल्याचा सांगितले. या प्रकरणातील कौशल्याने चारही आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील २० तोळे सोने, २ किलो चांदी, एक इंडिका कार, दुचाकीवाहन, ३ मोबाईल, खंजीर, बॅटरी असा एकूण १२ लाख २०० रुपयांचा मुद्देमालासह चारही आरोपींना जेरबंद केले आहे.