पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; आठ जणांना अटक, पाचजण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून बिहारकडे निघालेल्या एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याचे सांगत टोळक्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर टोळक्याने सलग दोन दिवस मुलीवर सामूहीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे स्टेशन भागासह वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, रिक्षा चालकांसह इतरांचा समावेश आहे. त्याशिवाय पाच जणांना ताब्यात घेतले आहे. वानवडी पोलिसांनी मुलीला चंढीगड येथून ताब्यात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय 27,रा. वैदुवाडी हडपसर), अकबर उमर शेख (वय 32, रा. मंगळवार पेठ जुना बाजार), रफिक मुर्तजा शेख (वय 32,रा.मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय 27,रा. कासेवाडी), प्रशांत सॅम्युयल गायकवाड (वय 32,रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय 29,रा. घोरपडी गाव), मोईब नईम खान (वय 24,रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय 36,रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत मुलगी मुळची बिहार येथील असून तिचे आई-वडील वानवडीत एकाच्या घरी माळीकाम करतात. 31 ऑगस्टला मुलगी बिहार येथील मित्राला भेटायला एकटीच निघाली होती. तिने पालकांना माहिती न देताच पुणे स्टेशन गाठले. मात्र बिहारला जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. रात्री उशीरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. त्यावेळी एका आरोपीची नजर तिच्यावर पडली असता त्याने मुलीला स्टेशनवर थांबण्याचे कारण विचारले. त्यावेळी तिने बिहार येथे जायचे असून, तिकिटासाठी पैसे नसल्याचे सांगितले. आरोपींनी मुलीला पैसे देण्याचे आमिष दाखवून रिक्षात बसवून नेले. त्यानंतर विविध ठिकाणी तिच्यावर सामूहीक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी तिला इतर आरोपींच्या ताब्यात दिले. त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला.

मोबाइल लोकेशनवरून गुन्ह्याचा छडा
मुलगी रात्री उशीर झाला तरी घरी न आल्यामुळे तिच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर 1 सप्टेंबरला वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांना मुलीच्या मोबाईलचे लोकेशन स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये दिसले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जात तपास केला असता, आरोपींनी तिच्यावर सामूहीक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पिडीत मुलगी मुंबईतून चंढीगडकडे निघालेल्या रेल्वेत असल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर वानवडी पोलिसांनी तत्काळ विमानाने थेट चंढीगड गाठले. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांसोबत संपर्क करून पिडीत मुलीला ताब्यात घेतले.

मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला टोळक्याने आमिष दाखवून ठिकठिकाणी नेत अत्याचार केला. याप्रकरणी आठजणांना अटक करण्यात आली असून पाचजण ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
– नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, झोन पाच