
महायुती सरकारकडून दिखावा केल्या जाणाऱ्या ‘वेगवान विकासा’चा घोळात घोळ समोर येत आहे. विलेपार्लेतील मेट्रोचा पूल अतिरिक्त उंचीमुळे पाडावा लागण्याची नामुष्की ओढवली असतानाच घाटकोपर येथील 30 टक्के काम पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा भाग पाडावा लागणार आहे. पुलाच्या डिझाईनमध्ये अचानक मोठा बदल करण्यात आल्यामुळे पुलाचे बांधलेले 3 पिलर कॅप्स अंशतः पाडून ते पुन्हा अधिक उंचीवर बांधावे लागणार आहेत.
अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान जुना पूल होता. तो पूल धोकादायक बनल्याने पाडून महारेलतर्फे केबल-स्टेड पुलाचे बांधकाम केले जात आहे. या केबल-स्टेड पुलाचा एक भाग लाल बहादूर शास्त्राr (एलबीएस) रोड ओलांडून गोळीबार रोडवर उतरणार आहे. याचवेळी दुसऱ्या बाजूने मुंबई महापालिकेमार्फत सर्वोदय रुग्णालय आणि श्रेयस दर्गादरम्यान एलबीएस रोडवर आणखी एक पूल बांधण्याची योजना आखली जात आहे. एलबीएस रोडवर दोन पूल समोरासमोर येणार असल्याने दोन्ही पुलांमध्ये उंचीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महारेलला पुलाचे 30 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आता 3 पिलर कॅप्स अंशतः पाडून ते नव्याने अधिक उंचीवर बांधावे लागणार आहेत. नव्या डिझाईननुसार मुख्य केबल-स्टेड पूल आधीच्या चारपदरी (2+2) ऐवजी आता 6 पदरी (3+3 लेन) केला जाणार आहे. हा पूल पुढील 80 ते 100 वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून डिझाईन केला जात आहे.
गोखले पुलाच्या कामातील गोंधळाची पुनरावृत्ती
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे केली जात आहेत. त्यात योग्य नियोजन आणि समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. घाटकोपर उड्डाणपुलाचे काम महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेण्यात आले आहे. मात्र, गोखले पुलाप्रमाणे या पुलाच्या कामात घोळ निर्माण झाला आहे. दोन पूल समोरासमोर आल्याने पुलाच्या काही भागाचे पुन्हा बांधकाम करावे लागणार आहे. या गोंधळाला पालिकेची चूक कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
























































