
सामना ऑनलाईन ,पाटण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तर कोरियातील नेते किम जोंग उन यांची भूमिका सध्या बजावत आहेत. सरकारविरोधात जो आवाज उठवेल त्याला ठार मारण्यात येते. आता फार काळ ही दादागिरी सहन केली जाणार नाही. त्यांचा उलटा प्रवाह सुरू झाला असून जनताच त्यांचे श्राद्ध घालेल, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी या ज्या प्रकारे सरकार चालवतात हे पाहून या देशाच्या घटनेला जुमानत नसल्याचे दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व त्या मानत नाहीत. तसेच लोकशाही व्यवस्थेत काम करण्यास तयार नाहीत. ‘नीती’ आयोगाच्या बैठकीत त्या आजवर कधीच सहभागी झाल्या नाहीत. ‘फनी’ वादळाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना फोन केला होता, पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी तो घेतला नाही. यावरून त्यांची अहंकारी वृत्ती दिसून येत असून फार काळ त्यांची सत्ता टिकणार नाही, असे गिरिराज सिंह म्हणाले.
























































