बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू, संगमनेर तालुक्यात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीनवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारात मंगळवारी घडली आहे. या घटनेने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, निष्पाप बालिकेचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवांशी संतोष वाकचौरे (वय 3) असे मृत बालिकेचे नाव आहे.

धांदरफळ खुर्द शिवारातील साकुर मळा परिसरात संतोष वाकचौरे यांची मुलगी शिवांशी ही अंगणात खेळत होती. तेथून काही फूट अंतरावरच तिची आई सुवर्णा जनावरांसाठी मका काढत होती. त्याच मक्याच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने शिवांशीचा गळा पकडला आणि तिला मक्याच्या शेतात घेऊन गेला. बिबट्याने शिवांशीला ओढत नेल्याचे पाहून आईने आरडाओरडा केला. ते ऐकून घरातील सर्वजण बाहेर आले. परिसरातील ग्रामस्थही वाकचौरे यांच्या घराकडे आले. मक्याच्या शेतातून शिवांशी हिला गंभीर जखमी अवस्थेत संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

वन विभागाला उशिरा जाग

शिवांशी हिचा मृत्यू केवळ वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पिंजरा लावण्याची मागणी करूनही पिंजरा लावला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धांदरफळ शिवारात एक बिबट्या वन विभागाने जेरबंद केला आहे. बालिकेला ठार करण्याची घटना घडल्यानंतर हालचाली करून त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. या पिंजऱयात या परिसरातील एक बिबट्या अडकल्याचे आढळून आले आहे.