नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पर्रिकर मंत्रालयात हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
parrikar-in-state-secretariat

सामना प्रतिनिधी । पणजी

स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दीर्घकाळ उपचार घेऊन आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात पोहोचले. 29 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज मंत्रालयात पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेत तिसऱ्यांदा उपचार घेऊन सप्टेंबरमध्ये गोव्यात परतल्यापासून पर्रिकर मंत्रालयात येऊ शकले नव्हते. गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यासाठी आजारी असून देखील येऊन पर्रिकर यांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर मुंबई आणि दिल्ली येथे उपचार घेऊन गोव्यात परतल्या नंतर ते आपल्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानावरून कामकाज हाताळत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशाशन ठप्प झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला सातत्याने घेरण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आरोग्याची माहिती मिळावी यासाठी काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सह्यांवरून देखील जोरदार आरोप होऊ लागले आहेत.

एम्समधून परतल्या नंतर दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी पर्रिकर यांनी 2 वेळा मंत्रिमंडळ बैठक, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बैठक, भाजप पदाधिकारी बैठक घेऊन आपले कामकाज सुरू ठेवले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सुरेश प्रभू यांनी पर्रिकर यांच्या घरी जाऊन विकास कामांच्या प्रश्नावर चर्चा देखील केली आहे.

पणजी येथे मांडवी नदी वरील तिसऱ्या पुलाची आणि झुवारी पुलाची पाहणी करण्यासाठी पर्रिकर बऱ्याच महिन्यांनंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर आज प्रथमच पर्रिकर घराबाहेर पडून मंत्रालयात पोहोचले आहेत. आज देखील पर्रिकर यांच्याकडे पाहून उपचार सुरू असल्याचे स्पष्ट दिसते. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील सोबत आहे.