
सामना ऑनलाईन । पणजी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. बऱ्याच कालावधीपासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते, गोव्यातील निवासस्थानी उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचा अंशही न लागलेल्या नेत्यांमध्ये मनोहर पर्रिकर यांचा समावेश केला जातो. एका छोट्याशा राज्यातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या पर्रिकर यांनी आपल्या मेहनतीच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद आणि संरक्षणमंत्रीपदही भूषवले.
मनोहर पर्रिकर यांचे पूर्ण नाव मनोहर गोपाल कृष्ण प्रभु पर्रिकर असे असून 13 डिसेंबर 1955 रोजी गोव्यातील मापुसा येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाल कृष्ण पर्रिकर तर आईचे नाव राधाबाई पर्रिकर असे होते. लोयोला हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. 12 वी नंतर त्यांनी मुंबईत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे पर्रिकर यांना मातृभाषा कोंकणीसह हिंदी, इंग्रजी, पोर्तुगिज आणि मराठी भाषाही अवगत होती.
राजकारणात सहभाग
शालेय दिनांपासूनच पर्रिकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यरत होते. शिक्षणासोबत आरएसएसमध्ये असताना ते समाजकार्यामध्ये मिसळून गेले होते. शिक्षणासाठी मुंबईत आल्याने ते काही काळ आरएसएसपासून दुरावले होते, परंतु त्यानंतर पुन्हा आरएसएससोबत जोमाने कामाला लागले. यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाचा सदस्य होण्याची संधी मिळाली. 1994 मध्ये त्यांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळाले आणि ते निवडूनही आले. परंतु या निवडणुकीत भाजपने विशेष कामगिरी केली नसल्याने पर्रिकर यांना विरोधी पक्षनेत्याचे पद मिळाले.
गोव्याचे मुख्यमंत्री
2000 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर पक्षांनी साथ दिल्याने भाजपला गोव्यात सत्ता स्थापन करता आली. सत्तेत आल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रीपदाची माळ मनोहर पर्रिकर यांच्या गळात घातली. 24 ऑक्टोबर, 2000 रोजी पर्रिकर यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रिकर यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. 2000 ते 2002, 2002 ते 2005, 2012 ते 2014 आणि 2017 ते 2019 या कार्यकाळात पर्रिकरांनी आपल्या कामाची छाप उमटवली.
पत्नीचे निधन
पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रिकर कॅन्सरने त्रस्त होत्या. पर्रिकरांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एक वर्षाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर पर्रिकरांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्याची जनता आणि दोन्ही मुलं उत्पल पर्रिकर आणि अभिजीत पर्रिकर यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
केंद्रात मंत्रिपद
2014 ला भाजपने केंद्रात बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर पर्रिकर यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले आणि त्यांच्याकडे संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2016 मध्ये उरी हल्ला झाल्यानंतर पर्रिकर यांनी लष्कराला खुली सूट दिली. त्यानंतर लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला.
गोव्यात पुन्हा मुख्यमंत्रीपद
2017 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यामध्ये भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला. मित्रपक्षांनी पर्रिकर मुख्यमंत्री असल्यास पाठिंबा देऊ असे म्हटल्याने पक्षाचा आदेश पाळत केंद्रामध्ये मंत्री असलेल्या पर्रिकर पुन्हा गोव्यात आले. येथे पर्रिकर यांनी 14 मार्च 2017 रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु याच दरम्यान त्यांना स्वादूपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. देश-विदेशामध्ये उपचार घेतल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर 17 मार्च, 2019 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.




























































