
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्यातील लोकसभेच्या 2 जागांसाठी 23 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. या दोन जागांच्या निवडणुकांसोबत मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या विधानसभा पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत. दोन्ही निवडणुकांचा निकाल तब्बल एका महिन्या नंतर 23 मे रोजी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्ली येथे लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांनी गोव्यातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांची स्वतंत्रपणे माहिती दिली.
गोव्यात लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा 2 जागा आहेत. त्यांच्या निवडणुका 23 एप्रिल रोजी होणार असून त्याच दिवशी म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी एकाच मतदान केंद्रावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदान करता येणार आहे.त शी व्यवस्था निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातील मतदारांना एकाच दिवशी दोनवेळा मतदान करावे लागणार आहे.
























































