गोवा एलईडी ट्रॉलरची घुसखोरी सुरूच

388

प्रखर प्रकाशझोतातील (एलईडी) मासेमारीस बंदी असतानाही सिंधुदुर्ग (मालवण) किनारपट्टीवर गेले काही दिवस अवैधरीत्या मासेमारी सुरू आहे. सुरू असलेल्या अवैध मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी गोवा येथील एलईडी ट्रॉलरवर पुन्हा एकदा कारवाई केली. दोन दिवसातील ही दुसरी कारवाई आहे.

पकडण्यात आलेल्या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी सापडली. ट्रॉलरवरील तसेच पाण्यात सोडण्यात येणारे एलईडी दिवे मत्स्यविभागाने जप्त केले आहेत. ट्रॉलरवरील मासळीचा लिलाव दांडी आवार येथे सायंकाळी उशिरापर्यत सुरू होता. मत्स्यव्यवसाय विभागाने गस्ती नौकेद्वारे रविवारी रात्री येथील समुद्रात अवैधरीत्या मासेमारी करणारा एक एलईडी ट्रॉलर पकडला होता. त्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा गोवा येथील एलईडीचा ट्रॉलर पकडण्याची कारवाई केली. या ट्रॉलरवरील बांगडा, बळा, कर्ली अशी मासळी आढळली आहे.

सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी शिवराज चव्हाण, पोलिस कर्मचारी मिलिंद पावसकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा, तांडेल सुदेश हेदवकर, खलाशी प्रभाकर हर्षकर, अंकुश तोसकर, राकेश नाटेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या