#GOBACKMODI पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूमध्ये, जनतेने दिले ‘गो बॅक’चे नारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-fail-lok sabha

सामना ऑनलाईन । चेन्नई

तमिळनाडूतील मदुराई येथे एम्स रुग्णालयाच्या पायाभरणी सोहळ्यासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तमिळनाडूतील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सध्या सोशल मीडियावरून तमिळनाडूतील जनतेने पंतप्रधानांना ‘परत जा’ असे सुनावले आहे. जसा इंग्रजांविरोधातील ‘सायमन गो बॅक’चा नारा गाजला होता तसाच सध्या सोशल मीडियावर ‘गो बॅक मोदी’ व ‘गो बॅक सॅडिस्ट मोदी’ हे ट्रेंड गाजत आहेत.

तमिळनाडूला गेल्या वर्षी गाजा वादळाचा तडाखा बसला होता. या वादळामुळे जवळपास तीन लाखांहून अधिक बेघर झाले तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. त्यावेळी पंतप्रधानांकडून अपेक्षित असलेली मदत तमिळनाडूला मिळाली नव्हती. त्याचा निषेध करण्यासाठी सध्या सोशल मीडियावरून ‘गो बॅक मोदी’ हा ट्रेंड चालवला जात आहे. ‘जे गाजा वादळानंतर आले नाहीत ते आता का तमिळनाडूत येत आहेत?’ असे सवाल देखील जनतेने पंतप्रधानांना केले आहेत. तसेच मोदींची व्यंगचित्रंही मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत.