सोने, चांदी, पेट्रोल, डीझेल.. अजून काय काय महागलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचं लक्ष ज्या महत्त्वाच्या घटकांकडे लागून राहिलेलं असतं त्यात थोडे हसू थोडे आसू अशी परिस्थिती असल्याचं दिसत आहे.

सध्या देशातला इंधनाच्या दरवाढीचा प्रश्न बघता पेट्रोल आणि डीझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, पेट्रोल डीझेलवर प्रति लीटर 1 रुपया सेस वाढवल्यामुळे आता इंधनाच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सामान्यांची हक्काची गुंतवणूक समजलं जाणारं सोनंही महागलं आहे. सोन्यावरची कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के केल्यामुळे आगामी काळात सोनं महागणार आहे. तीच गत चांदीचीही होणार आहे.

दुसरीकडे आयात केलेल्या इलेक्ट्रॉनिक्सवरही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. याखेरीज तंबाखूवरही शुल्क आकारलं जाणार आहे. याखेरीज आयात केलेल्या काजू, छापील पुस्तकं यांच्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. वर्तमानपत्र आणि नियतकालिकं यांच्यासाठी लागणारा छपाईचा कागद महागला आहे. स्प्लिट एसी, सीसीटीव्हीचे चार्जर किंवा अडाप्टर, लाउड स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरा, ऑप्टिकल फायबर वायर्स या वस्तुही महागल्या आहेत.

दुसरीकडे, लोकरीचा धागा, मोबाईलचे चार्जर किंवा अडाप्टर, सेट टॉप बॉक्स या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.