
संत नागेबाबा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केली आहे. त्याचे नागेबाबा सोसायटीमधील चार कर्जखात्यांमध्ये बनावट सोने आढळून आले आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर राजू चव्हाण (वय 35, रा. विनायकनगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नगर शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या गुह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संत नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीमध्ये आठ हजार 564 ग्रॅम म्हणजे सुमारे साडेआठ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 63 आरोपींविरुद्ध एक हजार 450 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या बनावट सोनेतारणमध्ये ज्ञानेश्वर राजू चव्हाण याला अटक केली आहे. त्याचे चार कर्ज खात्यांमध्ये बनावट सोनेतारण आढळून आले आहे. एका खात्यात 117.30 ग्रॅम, दुसऱया खात्यात 44.690 ग्रॅम, तिसऱया खात्यात 60.890 ग्रॅम, तर चौथ्या खात्यात 49 ग्रॅम बनावट सोने आढळून आले आहे. यावर त्याला एकूण आठ लाख 22 हजार रुपयांचे कर्ज दिले गेले. पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर चव्हाणला अटक करण्यात आली आहे.






























































