
सामना प्रतिनिधी । मुंबई
सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने समाधान व्यक्त केले आहे, मात्र पाच दिवसांचा आठवडा व जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवर महासंघ ठाम असून 5 जानेवारी रोजी या मागण्यांसाठी नैमित्तिक रजा आंदोलन पुकारण्यावर महासंघ ठाम आहे.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे तसेच अध्यक्ष विनोद देसाई यांनी स्वागत केले आहे, पण पाच दिवसांचा आठवडा तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात यावे व जुनी पेन्शन योजना या मागण्यांबाबत राज्य सरकारने प्राधान्याने निर्णय घ्यावा. येत्या 5 जानेवारी रोजी सामूहिक नैमित्तिक आंदोलन रजा आंदोलन पुकारण्याची वेळ आमच्यावर आणू नये असा इशारा महासंघाने दिला आहे.
आंदोलन मागे घ्यावे
महासंघाने 5 जानेवारीचे आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. देशातल्या सहा राज्यांत पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. राज्यात योग्य वेळी यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी मुनगंटीवार यांनी दिले.



























































