कोपरगावात दोन हजाराची लाच घेतांना निमतांनदाराला रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव  

नवीन खरेदीवर नावाची नोंद लावण्याकरीता दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका तक्रारदाराने कोपरगाव भुमिअभिलेख उपअधिक्षक  कार्यालयातील निमतानदार पदावर काम करणारे भुजंग साहेबराव सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीची दखल नगरच्या लाचलुचपत पथकाने घेऊन तक्रार केल्याबरोबर त्याच दिवशी काही तासात  दोन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सोमवारी  ५ वाजण्याच्या दरम्यान  ही कारवाई करण्यात आली.

नवीन खरेदीवर नावाची नोंद करण्यासाठी कोपरगाव उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतान धार पदावर काम करणारे भुजंग साहेबराव सूर्यवंशी (४४) यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयाची मागणी केली असता तडजोडी अंती दोन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. नगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे, सहाय्यक अधिकारी दीपक कारंडे, हवालदार तन्वीर शेख पोलीस नाईक आर.पी चौधरी विजय गंगुल, राधा खेमणार, हवालदार जोशी, चालक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोपरगाव कार्यालयात जाऊन ही धडक कारवाई केली. कोपरगाव शहरामध्ये या आठवड्यातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी भुमिअभिलेख कार्यालयामध्ये अनेक वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अनेक जण अडकलेले होते.

या कारवाईने कोपरगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत  आरोपी भुजंग सूर्यवंशी याच्यावर रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.