
ग्रामपंचायात निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून उमेदवारांनी आता वैयक्तिक प्रचारावर भर दिला आहे. मला संधी दिल्यास मी गावाचा विकास कश्या पद्धतीने करणार आहे हे मतदारांना पटवून देताना उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये, तर कमालीची चुरस लागली आहे. कुणाला किती मतं मिळतील याची आकडेमोड सुरू झाली असून शेवटच्या टप्प्यात विरोधांची मते आपल्याकडे वळविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे.
खेड तालुक्यातील अलसुरे, भेळसई, भोस्ते, चिंचवली, घाणेखुंट, कळंबणी बुद्रुक, कोंडिवली, निळीक, संगलट, तिसंगी या दहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्या आहेत. यापैकी तिसंगी आणि अलसुरे या दोन ग्रामपंचायती ग्रामस्थांनी बिनविरोध केल्या असल्याने उर्वरित आठ ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. या आठ ग्रामपंचायतीच्या काही जागादेखील बिनविरोध झाल्या आहेत.
ज्या जागांसाठी निवडणूक होत आहे त्या जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आता जीवतोड प्रचार करताना दिसत आहेत. निवडणूक जरी ग्रामपंचायतीची असली, तरी निवडणुकीत हरल्याचा ठपका बसू नये यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. एक दोन मताने का होईना विजय प्राप्त करायचाच, या इर्षेने सारे कामाला लागले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर सुरुवातीला प्रचार हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून केला जात होता, मात्र आता शेवटच्या टप्प्यात प्रचाराची पद्धत पूर्णपणे बदली असून आता सुरू असलेला प्रचार वैयक्तिक पातळीवर सुरू झाला आहे.
जे उमेदवार सरपंचपदाच्या खुर्चीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत, असे वाटायला लागले आहे. त्यामुळे मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांनी हात सैल सोडायला सुरुवात केली आहे. यातूनच रात्रीच्या ओल्या पार्ट्या झडू लागल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार काय डावपेच आखतो आहे हे कळावे म्हणून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकांना फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने निवडून येणाऱ्या उमेदवाराला तब्बल पाच वर्षे सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान होता येणार आहे. गावचा प्रथम नागरिक म्हणून मिरवण्याची संधी मिळणार की नाही हे ही निवडणूक ठरणार आहे. त्यामुळे सरपंचपदाची माळ गळ्यात घालून घायला सारेच उतावीळ झाले आहेत.
18 तारखेला प्रत्यक्ष मतदान आणि 20 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतो आणि कुणाला हार पत्करावी लागते हे 20 तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच हीच भूमिका ठेवावी लागणार आहे.

























































