काय होतं ते गेस्ट हाऊस कांड? ज्याने मायावती आणि मुलायमसिंह बनले कट्टर शत्रू

53

सामना ऑनलाईन । मुंबई

बसपा प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची शनिवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमुळे 23 वर्षांपूर्वी झालेल्या गेस्ट हाऊस कांडाच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. 1995 साली झालेल्या या गेस्ट हाऊस प्रकरणामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा काळा चेहरा देशासमोर आला होता आणि त्यानंतर मायावती आणि मुलायमसिंह यादव यांच्यात कट्टर शत्रुत्व निर्माण झालं होतं.

या प्रकरणाची सुरुवात झाली ती 1993च्या बाबरी वादग्रस्त वास्तुप्रकरणानंतर. उत्तरप्रदेशात भाजपला रोखण्यासाठी 1992मध्ये सपा आणि बसपाने युती केली होती. त्यानंतर सपाने 256 जागांवर तर बसपाने 164 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी 177 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. सपाचे 109 आमदार निवडून आले होते तर बसपाचे 67 आमदार निवडून आले होते. या दोन्ही पक्षांनी आघाडी करत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी मायावती सरकारमध्ये प्रत्यक्ष सामील नव्हत्या. त्यांनी मुलायमसिंह यांना बाहेरून समर्थन दिलं होतं.

त्यानंतर हळूहळू काही राजकीय निर्णयांवरून सपा-बसपामध्ये खटके उडू लागले. त्यामुळे मुलायम आणि मायावतींमधले संबंध बिघडू लागले. हे साल होतं 1995 चे. त्याच वर्षी मे महिन्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली की मायावती भाजपला समर्थन देणार आहेत. भाजपचे मायावती यांना आपल्या बाजूने वळवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. ही चर्चा भाजपनेच सुरू केली असावी अशी शक्यता आजही वर्तवली जाते. या चर्चांनुसार मायावतींनी भाजपला समर्थन दिल्यास त्यांना मुख्यमंत्री बनण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. यानंतर मायावतींनी मुलायमसिंह सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर उजाडला गेस्ट हाऊस प्रकरणाचा तो काळा दिवस. मुलायम यांना आपला निर्णय सांगितल्यानंतर 2 जून 1995 रोजी मायावतींनी लखनौ येथील गेस्ट हाऊसमध्ये आपल्या आमदारांसह बैठक बोलवली होती. दरम्यान सपाच्या कार्यकर्त्यांना अशी माहिती मिळाली की बसपा आणि भाजप यांची युती होणं निश्चित आहे. त्यामुळे सपा कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने गेस्ट हाऊसबाहेर जमा झाले आणि तिथे उपस्थित बसपा कार्यकर्त्यांना मारहाण करू लागले. परिस्थिती चिघळल्याचं पाहून मायावतीही एका खोलीत लपल्या आणि तेवढ्या वेळात बसपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पोलिसांना फोन केला, मात्र त्यावेळी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. असं म्हणतात की, त्यावेळी सपा कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून मायावतींशी असभ्य वर्तन आणि मारहाणही केली होती. पण, सुदैवाने मायावती त्यातून वाचल्या.

या धुमश्चक्रीनंतर मायावती यांनी सपाचं समर्थन परत घेतलं आणि त्यामुळे मुलायमसिंह यांचं सरकार पडलं. मायावती यांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही सपावर केला होता. या प्रकरणामुळे मायावती यांनी 1996 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ दिली आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. मायावती यांना झालेली मारहाण आणि असभ्य वर्तन यामुळे त्या भयंकर संतापल्या होत्या. तेव्हापासून त्यांचे आणि मुलायमसिंह यांच्यात कट्टर राजकीय वैर निर्माण झाले होते. या घटनेला बराच काळ लोटला असून परिस्थिती बरीच बदलली आहे. समाजवादी पक्षाची धुरा अखिलेश यादव यांनी आपल्या हातात घेतली असून सत्ताप्राप्तीसाठी त्यांनीच मायावती यांच्यापुढे आघाडीसाठी प्रस्ताव ठेवला होता. गेल्या निवडणुकीत झालेली वाताहत पाहिल्यानंतर मायावती यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा पोटनिवडणुकांसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकांमध्ये मिळालेला जबरदस्त विजय बघितल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आगामी निवडणुकांमध्ये देखील आघाडी करण्याचे निश्चित केले.

आपली प्रतिक्रिया द्या