
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील एका घरातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाळणाघरातील एक बाई आठ महिन्याच्या बाळाला निर्दयीपणे मारत असल्याचे दिसत आहे. या मारहाणीमुळे त्या मुलाचे ब्रेन हॅमरेज झाले असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मितेश पटेल हे त्यांची पत्नी व मुलासोबत सुरतमधील भंडेरा भागात राहतात. मितेश व त्यांची पत्नी दोघेही कामाला जात असल्याने त्यांनी मुलाला सांभाळायला एक बाई ठेवली होती. काही दिवसांपूर्वी मितेश यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचा मुलगा सतत रडत असतो असे सांगितले. त्यानंतर मितेश यांनी घरात सीसीटीव्ही लावले. त्यानंतर जो प्रकार त्यांनी बघितला ते बघून ते हादरलेच. मितेश यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या महिलेला अटक करण्यात आली. कोमल चंडेलकर असे त्या महिलेचे नाव आहे. सदर महिलेच्या लग्नाला पाच वर्ष झाली असून तिला अद्याप मूल नाही. कोमलने बाळाचे डोके बेडच्या कोपऱ्यावर आदळल्याने त्याचे ब्रेन हॅमरेज झाले आहे असे पोलिसांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील खारघरमध्ये हा प्रकार घडला होता. खारघरमधील पाळणाघरात काम करणाऱ्या महिलेने एका बाळाला मारहाण केली होती. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाले होते.




























































