गुजरात किनारपट्टीजवळ पुन्हा 600 कोटींचे ड्रग्ज पकडले, 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक

गुजरात किनारपट्टीजवळ पुन्हा एकदा ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि गुजरात दहशतवादविरोधी पथक तसेच हिंदुस्थानी तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करत गुजरात किनारपट्टीजवळ 86 किलो ड्रग्जच्या साठय़ासह 14 पाकिस्तानी नागरिकांनाही ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे. तटरक्षक दलाने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली.

गुजरात एटीएस आणि एनसीबीने भरसमुद्रात रात्रभर कारवाई करत पश्चिम अरबी समुद्रात पाकिस्तानी बोट पकडली. या बोटीत 14 पाकिस्तानी क्रू मेंबर्स होते. नाकाxटिक्स कंट्रोल ब्युरोने याआधीही गुजरात एटीएसच्या सहकार्याने 12 मार्च रोजी कारवाई केली होती. तटरक्षक दल, एनसीबी आणि एटीएसने अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ पोरबंदर किनाऱयापासून सुमारे 180 नॉटिकल मैल अंतरावर ड्रग्जची 60 पाकिटे घेऊन जाणारे जहाज पकडले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी दिली. दरम्यान, एनसीबी आणि हिंदुस्थानी नौदलाने फेब्रुवारी महिन्यात सर्वात मोठी कारवाई केली होती. गुजरातच्या किनारपट्टीजवळ करण्यात आलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली. या संयुक्त कारवाईत तब्बल 3 हजार 132 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याची किंमत 1 हजार कोटींहून अधिक होती. नौदलाने ते जहाज ताब्यात घेऊन पाच जणांना अटक केली होती.

दोन वर्षांत तीन मोठ्या कारवाया

गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानी नौदल आणि एनसीबीने हिंदी महासागरात अनेक मोहिमा तडीस नेल्या. तीन मोठी ऑपरेशन्स केली. फेब्रुवारी 2022 मध्ये एनसीबी आणि नौदलाने गुजरात किनाऱयाजवळ एक जहाज जप्त केले होते. यातून 2 क्विंटलहूनअधिक मेथाम्फेटामाइन जप्त करण्यात आले. मे 2023 मध्ये एनसीबीने पाकिस्तानी जहाजातून किमान 12 हजार कोटी रुपयांचे 2500 किलो मेथॅम्पह्टामाइन जप्त केले होते.