
गणराय म्हणजे कलेची आद्य देवता, चौसष्ट कलांचा अधिपती. कलावंत कलेच्या माध्यमातून गणेशाची भक्ती करतात. याच भावनेतून अनोख्या कलाकृती साकारण्याकडे कलावंतांचा कल असतो. सूरत येथील अशाच एका कलावंताने श्रीगणेशाची मिनिएचर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पवन कुमार शर्मा असे त्यांचे नाव असून त्यांनी मोती, शिंपले, सुई, डाळी, पेन्सिल आणि अन्य लहान वस्तूंवर गणराय साकारले आहेत.
पवन कुमार शर्मा हे मिनिएचर आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी या कलेला वाहून घेतले आहे. त्यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. यासंदर्भात शर्मा यांनी सांगितले की, आयुष्यात मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मी अनेक मिनिएचर तयार केली आहेत. मी पेन्सिलवर गणराय साकारले आहेत. ही माझी 0.5 मिमीची सर्वात लहान कलाकृती आहे.
शर्मा यांनी आतापर्यंत 13 मिनिएचर गणेश साकारले आहेत. विविध वस्तूंवर गणरायाची प्रतिमा कोरल्यानंतर त्यावर रंगकाम करण्यात येते. एका मोतीवर कोरीवकाम करताना पाच ते सहा तास लागतात, असे शर्मा यांनी सांगितले. त्यांनी तयार केलेले मिनिएचर गणेश पूर्णपणे इकोफ्रेंडली आहेत. त्यांच्या किमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱया आहेत. मोत्यांवरील गणराय गळ्यात पेंडंट म्हणूनही वापरले जाते, असे शर्मा यांनी सांगितले.
























































