
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जगभरातील अर्धे कुष्ठरोगी हिंदुस्थानात असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात करण्यात आला आहे. संघटनेने हिंदुस्थानातील कुष्ठरोग्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. कुष्ठरोगाबाबातची समजातील अनास्था, कुष्ठरोग्यांसोबत होणारा भेदभाव आणि अज्ञान, जनजागृतीचा अभाव या कारणांमुळे हिंदुस्थानात कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगभरात दरवर्षी दोन लाख कुष्ठरोगी आढळतात. यातील एक लाख कुष्ठरोगी हिंदुस्थानात आहेत. कुष्ठरोग निर्मुलनासाठी दोन महत्त्वाचे कायदे सरकारने मंजूर केले आहेत. त्यातील एक कायदा कुष्ठरोग्यांशी होणाऱ्या भेदभावाशी निगडीत आहे तर दुसरा कायदा कुष्ठरोगांमुळे होत असलेल्या घटस्फोटाशी निगडीत आहे. त्यांचेही जागतिक आरोग्य संघटनेने कौतूक केले आहे. कुष्ठरोग्यांसाठी पुरेशा आरोग्य सुविधा हिंदुस्थानात उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. हिंदुस्थानसह ब्राझील,दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
























































