सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कालपरवापर्यंत रुसवा धरून बसलेल्या वरुणराजाने आपला रुसवा सोडून आता धो-धो बरसायला सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यात आज सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यात ढगफुटीसारख्या अतिमुसळधार पावसाने उडविलेल्या हाहाकाराच्या स्मृतींना उजाळा मिळून लोक धास्तावले आहेत. कालपासूनच्या पावसामुळे कोयनेसह सर्वच धरणांच्या साठय़ात गतीने वाढ होऊ लागली आहे.

कोयना धरणांतर्गत विभागात संततधार पावसामुळे धरण पाणीसाठय़ात अपेक्षित वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 17 हजार 256 क्युसेक इतक्या पाण्याची आवक होत आहे. जून महिन्यात तब्बल 30 दिवसांत केवळ 1 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. मात्र, मागील 24 तासांत 1.41 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, पाणीउंचीत चार फूट नऊ इंचांनी वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण 16.45 टीएमसी इतका पाणीसाठा असून, त्यापैकी उपयुक्त साठा 11.45 टीएमसी इतका आहे.

कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरुवात झाली आहे. धरणाच्या पूर्वेकडे अद्यापि सिंचनाची मागणी कायम असल्याने कोयना धरणपायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.