कोकणात पावसाचा धुमाकूळ

33

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

कोकणात आज पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. रत्नागिरी जिह्यात वशिष्ठाr नदीने तर खेड तालुक्यात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिपळूण शहर पुराच्या पाण्यात बुडाले. चिपळूण बाजारपेठ आणि परिसरात पुराचे पाणी घुसले. खेर्डी, चिंचनाका, वडनाका, एसटी स्टॅण्ड पाण्याखाली गेले. बहादूरशेख पुलावरील वाहतूक बंद झाली. परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. रत्नागिरी जिह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 538 मिमी इतका पाऊस झाला.

परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. चिपळूण तालुक्यातील वशिष्ठाr नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बाजारपूल पाण्याखाली गेला. तसेच मुंबई-गोवा महामार्गाजवळील मळ्याचा गणपती मंदिरालाही पुराच्या पाण्याने वेढा घातला.

दापोलीत नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

दापोली तालुक्यात ओढे, नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे उन्हवरे- वावघरकडून भडवळे गावावरून खेड तालुक्यातील पन्हाळजे, सवणस गावांना जोडणाऱया कॉजवे पुलावरून पाणी वाहु लागले. त्यामुळे आपटी, साखळोली, शिवाजीनगर, शिवनारी या गावांचा संपर्क तुटला. दापोली-मंडणगड मार्गावरील पालगड गावातील नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.

खेड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला

खेड तालुक्यात आवाशी येथे मोरी वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला. दापोली -खेड रस्त्यावरील साखळोली पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. खेड परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राई -भातगाव मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. कालुस्ते येथे दरड कोसळून घरांचे नुकसान झाले तर मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे  मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

आपली प्रतिक्रिया द्या