
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्या मैदानात ‘मुंबईच्या राजाचा विजय असो’ असा आवाज घुमतो. त्याच मैदानात ज्यूनियर मुंबई श्रीचा आवाज घुमला. कार्यसम्राट नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या पुढाकाराने शिवसेना शाखा क्रमांक 204 आयोजित गणेश गल्लीच्या मैदानात पार पडलेल्या पीळदार ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेत बॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारीने सर्वांनाच धक्का देत आश्चर्यकारकरित्या बाजी मारली.
60 किलो वजनी गटात खेळत असलेल्या हेमंतने आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या सर्व खेळाडूंना मागे टाकत पंचाना आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या प्रेमात पाडले आणि ज्यूनियर्स शरीरसौष्ठवपटूंसाठी ऑस्कर असलेल्या स्पर्धेवर आपले नाव कोरले. दिव्यांगाच्या मुंबई श्रीमध्ये माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले प्रथम आला तर मास्टर्स गटात संतोष ठोंबरे, मोहम्मद शेख आणि मुपुंद लांडगे आपापल्या गटात अव्वल ठरले.
मुंबईच्या राजाचे मुंबईतील हक्काचे स्थान असलेली गणेशगल्ली ज्यूनियर मुंबई श्रीच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा शेकडो शरीरसौष्ठवपटूंच्या गर्दीने फुलली होती. एकंदर सहा गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण 90 ज्यूनियर्सनी आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन केले. महाविद्यालयीन शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेतही मुंबईच्या शरीरसौष्ठवाची खरी ताकद दिसली. स्पर्धेच्या प्रत्येक गटात तगडे स्पर्धक आणि अटीतटीची लढत दिसली. सालमचा प्रशांत सडेकर 55 किलो वजनी गटात सरस आला. 60 किलो वजनी गटात बॉडी वर्कशॉप हेमंत भंडारी अव्वल आला. पुढच्या गटात त्याच जिमच्या गिरीश मुठेने बाजी मारली.
परब फिटनेसचा अक्षय खोत 70 किलोमध्ये सरस ठरला. अंतिम दोन गटांमध्ये योगेश मोहिते आणि नितांत कोळी गटविजेता ठरला. या सहा खेळाडूंमध्ये झालेल्या जेतेपदाच्या लढतीत शेवटच्या तीन गटातील विजेत्यांपैकी कुणी बाजी मारेल, असाच क्रीडाप्रेमींचा अंदाज होता. प्रेक्षकांमधूनही वरच्या वजनी गटातील खेळाडूंच्या नावाचा आवाज येत होता, पण जेव्हा विजेत्याचे नाव घोषित केले तेव्हा सारेच शांत झाले. या लढतीत वयाने विशी ओलांडलेल्या सहाही खेळाडूंमध्ये सर्वच अंगांनी सरस असलेल्या हेमंतची सरशी झाली. वजनाने कमी असला तरी त्याच्या सर्व अंगाची तयारी इतरांपेक्षा उठून दिसली आणि तोच विजेता ठरला.
या महाविद्यालयीन खेळाडूंसाठी स्फूर्तीदायक असलेल्या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आणि नगरसेवक अनिल कोकीळ, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत आणि सुनिल शेगडे, कार्याध्यक्ष मदन कडू, संजय चव्हाण आणि शाखाप्रमुख किरण तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.


























































