लेख – आंदोलन चिरडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ([email protected])

चीनने आपल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याकरता तंत्रज्ञानाच्या मदतीने एक सर्व्हेलन्स सिस्टिम तयार केलेली आहे. तिच्या आसपास जगातले कुठलेही देश पोहोचू शकत नाहीत. या सर्व सर्व्हेलन्स सिस्टिमच्या मदतीने चीन आपल्या सगळ्या विरोधकांवर, निदर्शकांवर लक्ष ठेवून आहे. गेली अनेक वर्षे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर पश्चिम जगताचे अधिराज्य होते, परंतु आता चीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ‘न भूतो न भविष्यति’ अशा पद्धतीने शोध लावीत आहे आणि वापर करत आहे. यामुळे चीनला यापुढे सरकारच्या विरोधातील कुठलेही आंदोलन अगदी सहज चिरडता येईल.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने अनेक भागांत लॉकडाऊन लागू करण्यात आलं. चीनमधील या झिरो कोविड धोरणाबाबत देशभरात मोठय़ा प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. लोक रस्त्यावर उतरून सध्याच्या चीन सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. यासोबतच ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.  चीनमध्ये होणारी निदर्शने थांबविण्याकरिता, येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी करण्याकरिता आणि निदर्शनांमध्ये भाग घेतलेल्यांना पकडण्याकरिता चीन वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहे. उदाहरणार्थ ‘फेशियल रेकॉग्निशन’ या तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीमध्ये, निदर्शनांमध्ये भाग घेतलेल्यांना, आरडाओरडा करणाऱ्यांना, सोशल मीडियावरती चीन सरकारच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यांना, व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना गर्दीतून पकडत आहे आणि तुरुंगात टाकत आहे.

वेगवेगळ्या चॅट ग्रुपमध्ये, मेसेजिंग ऍपमध्ये तिथल्या ऍडमिनिस्टरला जबाबदार ठरवून, तिथे टाकली जाणारी माहिती, पोस्टला सेन्सॉर करत आहे किंवा सरकारविरोधी पोस्ट टाकणाऱ्यांना पकडत आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या सेलफोनवर सरकारचे ऍप डाऊनलोड करायला भाग पाडत आहे, ज्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडीओज, मेसेजेसवर लक्ष ठेवून सरकारला त्यांना पकडता येईल.

कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद व्यक्तींना गर्दीतून नेमके पकडणे अतिशय आव्हानात्मक असते. चिनी पोलिसांना स्पेशल गॉगल्स किंवा चष्मे दिले गेले आहेत. ज्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उभे राहून तिथे असलेल्या संशयास्पद शक्तींना ते सरकारकडे असलेल्या डेटाच्या मदतीने, त्यांच्या चेहऱ्याच्या मदतीने पडू शकतात.

चीन सरकारने रेल्वे स्टेशन, बस स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी रोबो पोलीस तैनात केले आहेत, जे गर्दीमध्ये लपलेल्या, जामिनावरून पळून गेलेल्या, हिंसाचारात भाग घेतलेल्या संशयित व्यक्तींना पकडू शकते. हिंसाचार झाला की, तिथे हिंसाचार करणाऱ्यांच्या शिवाय बघ्यांची किंवा आगंतुक नागरिकांची गर्दी जमा होते, ज्यामुळे हिंसाचारावर काबू करणे कठीण होते. अशा प्रकारचे बघे हिंसाचार बघण्याकरता, त्याचे व्हिडीओज काढण्याकरता एकत्र झाले की आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने चिनी पोलीस लगेच त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवतात, पटकन तिकडून चालते व्हा, नाही तर तुम्हाला पकडण्यात येईल. यामुळे बघ्यांची गर्दी कमी होते आणि हिंसाचार करणाऱ्यांना पकडण्यात मदत मिळते.

सोशल मीडियावर असलेल्या प्रत्येक नागरिकांच्या पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या राहणाऱ्या जागेशी जोडले गेलेले आहे, त्यामुळे गरज पडली तर त्यांना पकडणे सोपे होते. यामुळे जे नागरिक हिंसाचार झाल्यानंतर किंवा निदर्शनानंतर पळून गेले होते, त्यांनासुद्धा त्यांच्या घरातून पकडले जात आहे.

भारत डेटा प्रायव्हसीचे नियम आणि कायदे आणत आहे. मात्र चीनने त्यांच्या नागरिकांची पूर्ण माहिती गोळा केलेली आहे. यामुळे भविष्य सांगणारे सॉफ्टवेअरच्या (predictive software) मदतीने जे नागरिक सरकारकरता त्रासदायक बनू शकतील किंवा निदर्शनात भाग घेतील, किंवा सरकारविरोधात लिहितील, अशांना प्रेडिक्टिव्ह सॉफ्टवेअरच्या मदतीने सांगितले जाते की सरकारचे तुमच्यावर लक्ष आहे. कुठल्याही सरकारविरोधामध्ये भाग घेऊ नका. याच सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांना पकडले पण जाते.

कोरोना किंवा चिनी व्हायरसच्या काळामध्ये प्रत्येक चिनी नागरिकाला एक क्यूआर कोड देण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांना कोरोना झाला आहे की नाही हे कळायचे आणि हीच माहिती सरकारलासुद्धा असायची. जर कोरोना झाला असेल तर त्यांचा कोड लाल रंगाचा व्हायचा, ज्यामुळे त्यांना घराच्या बाहेर जाण्याकरिता किंवा गर्दी असलेल्या ठिकाणात जाण्याकरिता बंदी केली जायची. अर्थात कोरोना कंट्रोल करण्याकरता हे वापरले जात होते, परंतु आता याचा वापर चीन सरकार नागरिकांना सरकारविरोधी निदर्शनांना जाण्यापासून थांबवण्याकरिता करीत आहे.

निदर्शनामध्ये भाग घेणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओज काढण्याकरता आणि त्यांची माहिती लगेच कंट्रोल रूममध्ये पाठवण्याकरता ड्रोनचा वापर मोठय़ा प्रमाणामध्ये केला जात आहे. ज्यामुळे आकाशातून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले जातात आणि भाग घेणारे कधी पण सांगू शकत नाही की, आम्ही निदर्शनाकरिता गेलो नव्हतो. आकाशातून फोटो आणि व्हिडीओज काढणे अतिशय सोपे असते आणि यामुळे पूर्ण गर्दीवर लक्ष ठेवणे अतिशय सोपे होते. मोबाईलच्या मदतीने एका वेळेला एकच व्हिडीओ काढता येतो. परंतु ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने पुष्कळ जास्त जागांवर लक्ष ठेवता येते.

आपल्याकडे निदर्शकांना पांगवण्याकरता लाठीमार किंवा अश्रुधुराचा वापर कधी कधी केला जातो. मात्र चीनमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी पांगवली जाते. जागेच्या अभावी आपण फक्त सोनिक गन या बंदुकीचे  विश्लेषण करू. सोनिक गन ‘सोनिक रे’ फायर करते. ज्यांच्यावर ती फायर  होते त्यांना अनेक जैविक परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की सोनिक व्हायब्रेशनच्या मदतीने कानावरती, डोळ्यावरती, पोटावरती, किडनीवरती आणि मस्तकामध्ये नागरिकांना काही काळ वेदना होतात आणि इतर पुष्कळशा जैविक परिणामांना सामोरे जावे लागते.

बाकीच्या जगामध्ये सोनिक गन अजून वापरण्यात आलेली नाही, परंतु चीनमध्ये ती वापरली जाते. काही सोनिक गन एवढय़ा मोठय़ा असतात, की त्यांना वाहनावर बसवले जाते आणि तिथून फायर केले जाते.