
मागील काही वर्षांमध्ये डिजीटल व्यवहारत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या अनेकजण पैसे मोबाईलमध्येच घेऊन फिरतात. मात्र आर्थिक कामांसाठी मोबाईलचा वाढत वापर आणि त्यातून वाढणारे डिजीटल फसवणुकीचे प्रकार यांचे धोके वेळीच ओळखणं गरजेचं आहे. सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आपण त्याला बळी पडू नये म्हणून काही विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हल्ली व्यवहारासाठी सगळीकडे आपल्याला पॅनकार्ड आणि आधारकार्डची आवश्यकता असते. तसेच आयकर विभागाच्याही सर्व कामांसाठी तुमचं पॅनकार्ड महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याचे महत्त्व पाहता फसवणूक करणारी टोळी त्याच्यावर नजर ठेवून असते. याआधी तुम्ही डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा गैरवापर झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र आता पॅनकार्ड आणि आधारकार्ड सारख्या महत्त्वाच्या डॉक्युमेन्टचा कोणी गैरवापर तर करत नाही ना? हे देखील पाहाणं गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या पॅनकार्डचा आधार घेऊन तुमच्या नावाने लोन काढलं जाऊ शकतं. यासाठी तुम्ही सिबिल, इक्विफॅक्स, पेटीएम, बँक बझार किंवा क्रिफसोबत तुमचा सिबिल स्कोअर चेक करू शकता आणि रेकॉर्ड पाहू शकता.
पॅन कार्डचा गैरवापर होतोय? कुठून आणि कसं तपासाल?
तुमच्या नावे कर्ज आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही अनेक वेगवेगळ्या क्रेडीट ब्युरोमधून आपल्या पॅन कार्डचा रेकॉर्ड तपासू शकता. त्यातून तुम्ही नेमकं किती लोन काढलंय किंवा तुमचे आर्थिक व्यवहार नेमके कसे आहेत, याची माहिती तपशीलवार आढळते. त्यासाठी सिबिल, ईक्वीफॅक्स, एक्सपेरीअन सारख्या क्रेडिट ब्युरोची मदत घेता येऊ शकेल.
यासोबतच तुम्ही पेटीएम किंवा बँक बाझार या साईट्सवरुनही आपल्या पॅनचा रेकॉर्ड तपासू शकता. आपलं नाव, जन्म तारीख आणि पॅन कार्ड टाकून तुम्हाला कर्जाबाबतचे हे तपशील मिळू शकतील. दरम्यान, पॅन कार्डचा गैरवापर टाळायचा असेल, तर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड शक्यतो कुणाकडे देऊ नका. या दोन्ही डॉक्युमेन्ट्सचे नंबर आपल्याकडे सुरक्षित राहतील, याची खात्री बाळगा.


























































