लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कागदपत्रांची सत्यता काळजीपूर्वक तपासली का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्य माणसांना कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे कठीण जाईल हे आम्ही समजू शकतो; पण तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवत्ते आहात. त्यामुळे कागदपत्रांची तुम्ही काटेकोरपणे सत्यता तपासायला हवी होती. ती सत्यता तुम्ही काळजीपूर्वक तपासली का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज नवाब मलिक यांना विचारला. दरम्यान या प्रकरणावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक नवनवीन आरोप करत आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाची नाचक्की होत असल्याचा आरोप करत ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील अर्षद शेख म्हणाले, मलिक यांनी जी कागदपत्रे सादर केलेली आहेत त्यात पालिकेतून मिळवलेला जन्मदाखला आणि निकाहनामा यांचा समावेश आहे. मात्र याची पडताळणी झालेली नाही. वानखेडे हिंदू असून त्याबाबतचे पुरावे आहेत. तसेच समीर वानखेडे परदेशात गेल्याचे पह्टो दाखविले आहेत. मात्र तो परदेशातील नसून मुंबई विमानतळावरचा आहे. मलिकांनी आरोप करताना पह्टो प्रत सादर केलेली आहे, मात्र ती कागदपत्रे मूळ नाहीत. त्यामुळे ती ग्राह्य धरता येणार नाहीत.

नवाब मलिकांचा दावा

मलिक यांनी युक्तिवादा वेळी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. खंडणी उकळण्यासाठी हा बनाव रचण्यात आला तसेच वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र खोटे असल्याचे एकही कागदपत्र त्यांना सादर करता आले नाही. हे प्रमाणपत्र पालिकेद्वारे दिले जाते ते जर बनावट असेल तर समीर वानखेडे यांनी सुधारित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करायला हवा. वानखेडे खोटे बोलत असून आपल्याविरुद्ध उच्च न्यायालयाने आदेश द्यावा यासाठी ते सूटद्वारे प्रयत्न करत आहेत. हा सगळा बनाव असल्याचे आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याचे वानखेडे यांचे म्हणणे आहे. मात्र तसे काहीच नाही. ही कागदपत्रे खरी असल्याचे मलिक यांच्या वतीने अॅड. दामले यांनी सांगितले.