
अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर रझा अकादमीसंदर्भात पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये जर त्यांची भूमिका दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. दंगलीतील दोषींवर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिला.
त्रिपुरामधील घटनेनंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये दंगल उसळली होती. राज्याच्या पोलिसांनी गृह विभागाला अहवालही सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर एका टीव्ही चॅनेलशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी अमरावतीतील दंगलीवर भाष्य केले. ते म्हणाले की, याची गुप्तचर विभागाला माहिती मिळाली होती, पण येवढय़ा मोठय़ा प्रमाणावर होईल असे वाटले नव्हते. बांगलादेशात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्रिपुरामध्ये आंदोलन झाले आणि त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी एका संघटनेने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्यातून दगडफेकीसारख्या घटना झाल्या. ते शांत झाल्यानंतर एका राजकीय पक्षाने बंदची हाक दिली आणि पुन्हा तसाच प्रकार घडला. ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी आहे, पण घटना घडत आहेत की घडवल्या जात आहेत, यासंदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत. चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर कारवाई केली जाईल असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. यामध्ये रझा अकादमीची भूमिका दिसली तर त्यांच्यावरही कारवाई होईलच, असे ते म्हणाले.
























































