तीव्र उन्हामुळे डोळे कोरडे पडत आहेत, करा ‘हे’ सोपे उपाय, मिळेल आराम

तीव्र उन्हामुळे डोळ्यांचे विविध आजार होऊ शकतात. काही जणांना कामानिमित्त दुपारीच घराबाहेर पडावे लागते, अशा वेळी डोळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांच्या बुबुळांना धोका निर्माण होतो.

डोळे हा खूप नाजूक अवयव असल्याने तो सूर्याची अतिनील किरणे जास्त वेळ सोसू शकत नाही. उन्हाळ्यात डोळे अतिनील किरणांच्या संपर्कात जास्त वेळ आल्यास लेन्स प्रोटीनमध्ये बदल होतो. ज्यामुळे मोतीबिंदू आणि दृष्टी खराब होणे यासारख्या विविध समस्या उद्भवतात तसेच बेसल सेल कार्सिनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमासारख्या कर्करोगाचा धोका वाढतो आणि यूव्ही रेटिनाचेही नुकसान होऊ शकते.

आजकाल डोळे कोरडे पडणे ही एक मोठी समस्या आहे, विशेषत: बराच वेळ अभ्यास करणार्‍या मुलांमध्ये आणि जे सतत मोबाइल किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसतात त्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. बरेच लोक दिवसातील 8-15 तास स्क्रीनसमोर असतात. ज्यामुळे डोळ्यांमध्ये जास्त कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे डोळ्यांमधून सतत घाण येते तसेच तुम्ही सतत डोळे चोळू लागता. अशा वेळी डोळे खूप लाल दिसतात आणि त्यांतून पाणी येते.

डोळे कोरडे होऊ नयेत म्हणून काय कराल?
– डोळे कोरडे पडून नयेत म्हणून ते वारंवार धुवावेत. दिवसा दर 10 मिनिटांनंतर डोळ्यांवर पाणी मारा, यानंतर डोळे घट्ट बंद करून पुन्हा उघडा. डोळ्यांची सतत उघडझाप करा, यामुळे डोळ्यातील कोरडेपणा कमी होईल.डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आय ड्रॉप्सचाही वापर करू शकता.

– डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीर हायड्रेट असणे महत्त्वाचे आहे; कारण डिहायड्रेशनमुळे डोळ्यांवर परिणाम होतो. मॉइश्चरायझर लावतानाही ते डोळ्यांच्या भोवती चोळा, उन्हात बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे सतत चोळू नका.

– उन्हाळ्यात डोळ्यांची आणखी एक प्रमुख समस्या जाणवते ती म्हणजे डोळ्यांच्या बुबुळांच्या पुढच्या भागात दाह निर्माण होतो. यामुळे केराटायटिस, एंडोफ्थाल्मायटिस, सेल्युलायटिस आणि स्टाय यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. यात उन्हाळ्यात अनेकांना डोळे येतात. डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार आहे. डोळे आलेल्या व्यक्तिचा दुसऱ्याला संसर्ग झाल्याने होतो.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहार
– डोळ्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. त्यासोबत आहारात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि ई, ओमेगा-३ आणि झिंक यांसारख्या अँटिऑक्सिडंट घटकांचाही समावेश असणे गरजेचे आहे. यामुळे डोळ्यांचे गंभीर आजार रोखण्यास मदत होते. यात बाहेरचे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे.

– सफरचंद, गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जातात, कारण यात बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांना विविध संसर्गांपासून दूर ठेवते. याशिवाय व्हिटॅमिन सीच्या सेवनासाठी लिंबू आणि आंबट फळांचा आहारात समावेश करा. तसेच व्हिटॅमिन ईने समृद्ध ड्रायफ्रुट्सचे सेवन करा. यामुळे मोतीबिंदू आणि वाढत्या वयासोबत डोळ्यांसंबंधित होणाऱ्या आजारांपासून दूर राहू शकता.

– ओमेगा-3 ने समृद्ध सॅल्मन फिश हादेखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो, ज्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यात मदत होते तसेच अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आणि झिंक असते, जे वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांपासून दूर ठेवते, तसेच रातांधळेपणाची समस्या रोखण्यासही मदत करते.