
>> महेश कोळी
तंत्रज्ञानाचे युग हे मानवी जीवन सुगम आणि सोपे बनवण्यासोबतच नवीन आव्हानेदेखील उभे करत आहे. तंत्रज्ञानाचा आनंद घेताना त्यामध्ये लपलेल्या अदृश्य धोक्यांबद्दलही तितकेच जागरूक असणे आवश्यक आहे.
स्मार्टफोनच्या सहाय्याने विविध प्रकारची पोझ देऊन सेल्फी काढणे हा कोविडपेक्षा वेगाने पसरलेला संसर्ग आहे. या संसर्गाचा पुढचा टप्पा म्हणजे तत्काळ हे सेल्फी किंवा फोटो सोशल मीडियावर अपलोड करणे. कुणीही याला अपवाद राहिलेले नाही. या सर्वांना हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, प्रगत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून या सेल्फी किंवा फोटोंमधून बोटांचे ठसे चोरले जाऊ शकतात व त्याचा गैरवापर करून संबंधितांना मोठे नुकसान पोहोचवले जाऊ शकते. उच्च दर्जाच्या आणि चांगल्या प्रकाशात घेतलेल्या सामान्य फोटोंमधून बोटांच्या ठशांचे नमुने सहजपणे मिळवता येतात, ही बाब सायबर सुरक्षातज्ञांनी आपल्या प्रात्यक्षिकांमधून सिद्ध करून दाखवली आहे.
स्मार्टफोनचा वापर जसजसा वाढू लागला तसतसे सोशल मीडियाशी जोडले गेलेल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. आजघडीला प्रत्येक जण आपल्या रोजच्या आयुष्यातील विशेष आणि आनंदाचे क्षण, छोटेमोठे प्रसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यासाठी आसुसलेला असल्याचे दिसते. पर्यटनस्थळी, हॉटेलमध्ये, विवाह समारंभांमध्ये, घरगुती कार्यक्रमांमध्ये, गार्डनमध्ये, मॉलमध्ये कुठेही गेल्यानंतर तेथील फोटो तत्काळ फेसबुक, व्हॉटसअॅप, इन्स्टा आदी सोशल मीडियावर अपलोड केले जातात. अगदी सहजपणे पोस्ट करत असलेले हेच फोटो आपल्या वैयक्तिक ओळखीसाठी आणि वित्तीय सुरक्षेसाठी एक अत्यंत गंभीर धोका बनत चालले आहेत. विशेषत एआयच्या वाढत्या प्रभावाने सायबर गुह्यांना चिंताजनक वळण दिले आहे.
सध्याच्या काळात जगभरातील सायबर सुरक्षा तज्ञ सातत्याने असा इशारा देत आहेत की, आपल्या मोबाईल फोन किंवा कॅमेऱ्याद्वारे घेतलेल्या सामान्य सेल्फी किंवा फोटोमधूनही कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट सहजपणे चोरी केले जाऊ शकतात. भविष्यात त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आजच्या काळात उपलब्ध असलेली अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स आणि एआय टूल्स कोणत्याही अंधुक किंवा फिकट फोटोला कमालीचे स्पष्ट आणि हाय-डेफिनिशन बनवण्यास सक्षम आहेत. फोटोमधील अगदी बारीक रेषा स्पष्ट करणे, त्यांचा आकार वाढवणे आणि त्यामध्ये लपलेले सूक्ष्म तपशील ओळखणे हे डिजिटल प्रणालींसाठी अत्यंत सोपे झाले आहे. याच कारणामुळे मानवी बोटांच्या टोकांवर असणाऱ्या अद्वितीय आणि अत्यंत बारीक रेषा इलेक्ट्रॉनिक विश्लेषणाच्या माध्यमातून फोटोमधून अगदी अचूकपणे काढल्या जाऊ शकतात. उच्च दर्जाच्या आणि चांगल्या प्रकाशात घेतलेल्या सामान्य फोटोंमधून बोटांच्या ठशांचे नमुने सहजपणे मिळवता येतात, ही बाब सायबर सुरक्षातज्ञांनी सिद्ध करून दाखवली आहे.
आपल्याकडे पीस साईन दाखवताना म्हणजेच विजयाचे निशाण म्हणून दोन बोटे दाखवण्याची सवय अनेकांना असते. काही जण तर कसलाही विजय मिळवलेला नसतानाही सेल्फी काढताना दोन बोटे उंचावून पोझ घेतात. सुरक्षातज्ञ ली चांग यांनी एका चिनी
रिअॅलिटी शोमध्ये हा धोका प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध करून दाखवला. त्यांनी एका प्रसिद्ध व्यक्तीच्या सेल्फीचा वापर करून, त्या व्यक्तीने केलेल्या ‘पीस साईन’मधून बोटांचे ठसे कसे गोळा केले जाऊ शकतात हे दाखवून दिले. एखादा फोटो साधारण 1.5 मीटर अंतरावरून घेतला असेल आणि कॅमेऱ्याची गुणवत्ता उत्तम दर्जाची असेल तर त्या फोटोमधून बोटांच्या ठशांचे तपशील 100 टक्के अचूकतेसह मिळवता येतात.
पासवर्ड किंवा गोपनीय पिन नंबर चोरीला जाण्यापेक्षा बोटांच्या ठशांची म्हणजेच बायोमेट्रिक डेटाची चोरी होणे हे अत्यंत गंभीर मानले जाते. कोणतीही व्यक्ती आपल्या बोटांचे नैसर्गिक ठसे बदलू शकत नाही. यामुळेच बायोआयडेंटी डेटाचा गैरवापर कोणत्याही व्यक्तीसाठी दीर्घकालीन आणि कधीही न भरून निघणारी समस्या निर्माण करू शकतो. एआय आधारित तंत्रज्ञान क्षेत्रात रोज होणाऱ्या नवीन संशोधनांमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैज्ञानिक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, मशीन लर्निंगवर आधारित एआयच्या सहाय्याने विविध सुरक्षा उपकरणांना सहजपणे चकवू शकतील असे हुबेहूब दिसणारे बनावट फिंगरप्रिंटस् तयार करणे शक्य झाले आहे. वैज्ञानिकांनी प्रयोगशाळांमध्ये अशा कृत्रिम आणि एआय जनित फिंगरप्रिंटस् विकसित करण्यात यशही मिळवले आहे.
सायबर गुन्हेगार नेहमीच मानवी बेसावधपणाची आणि सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींची वाट पाहत असतात. म्हणूनच, डिजिटल जगात निरंतर सतर्कता बाळगणे हीच आपली सर्वात मोठी आणि मजबूत सुरक्षा ढाल ठरणार आहे.
(लेखक संगणक अभियंता आहेत.)

























































