विद्यार्थी, शिक्षक, पालकांना राज्य सरकारचा दिलासा; अखेर बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीची लेखी परीक्षा मेअखेरीस तर दहावीची लेखी परीक्षा जूनच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील दहावी, बारावीच्या तब्बल 27 लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासोबतच राज्यात पार पडणाऱया सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिजसह अन्य केंद्रीय शिक्षण मंडळांनादेखील त्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करणार असल्याचे यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून अनेक शिक्षक, पालक, मुख्याध्यापक संघटनांसोबतच लोकप्रतिनिधींनीही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याविषयी शालेय शिक्षण विभागाला सूचना दिल्या होत्या. या सर्व सूचनांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

  • दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्यासाठीचे नवीन वेळापत्रक हे राज्यातील एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन जाहीर केले जाणार आहे.
  • कोणत्या भागात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे त्याचा आढावा घेऊन आणि स्थानिकांची मते घेऊनच  नवीन वेळापत्रक तयार केले जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडून देण्यात आली.
  • कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावी परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये आतापर्यंत दोन वेळा बदल करण्यात आला होता. मात्र आता परीक्षा पुढे ढकलल्याने हा तिसऱयांदा बदल केला जाणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे शिक्षक, पालक संघटनांनी स्वागत केले आहे. बारावीची परीक्षा 23 एप्रिल तर दहावीची 29 एप्रिलपासून सुरू होणार होती. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांना कसे पाठवायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता. शिक्षक, मुख्याध्यापकांसमोरही कोरोना प्रतिबंधक उपाय करून परीक्षा घेण्याचे मोठे आव्हान उभे होते.

बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. आधीच अभ्यासाच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची चिंताही लागली आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर प्रश्न उभा होता. विद्यार्थ्याचे आरोग्य ही महाविकास आघाडी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
– वर्षा गायकवाड,  शालेय शिक्षणमंत्री