वन्यप्राण्याची शिकार; दोघांना अटक, चंदगड पोलीस व पाटणे वन विभागाची संयुक्त कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील तुडिये-कोलीक मार्गावरील जंगलात शिकार करणाऱया दोघांना पकडण्यात चंदगड पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून सांबरसदृश वन्यप्राण्याचे मांस व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, चार वाहनांमधून आलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने ही शिकार केली होती. कारवाईवेळी अंधाराचा फायदा घेत टोळीतील इतर साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. यात आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता चंदगड पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शाह सैफुद्दीन शमशुद्दीन (रा. बंगळुरू) व चेतन कुमार सुभाषचंद्र अभिगिरी (रा. गदग, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे रात्रगस्त घालत असताना तुडिये-कोलीक मार्गावरील एका पोल्ट्री फार्मजवळ 10 ते 12 इसम चार वाहनांसोबत संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यामुळे त्यांना हटकले असता सर्वजण घाईगडबडीत पळून जाऊ लागले असता, यामधील दोघांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांच्या ताब्यातून स्नायपर रायफल, धारदार शस्त्रे व एका वाहनामध्ये वन्यप्राण्याचे मांस आढळून आले. त्यामुळे या घटनेची माहिती पाटणे वन विभाग परिक्षेत्राचे अधिकारी प्रशांत आवळे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहनातील वन्यप्राण्याच्या मांसाची पाहणी केली असता, ते सांबरसदृश वन्यप्राण्याचे मांस असल्याचे निदर्शनास आले.

चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस शिपाई संदिप कांबळे, युवराज पाटील, पाटणे परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रशांत आवळे, बी. आर. भांडकोळी (वनपाल कळसगादे), एम. आय. सनदी (वनरक्षक कोलीक) यांनी या कारवाईत भाग घेतला.