
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे शेती वाटणीच्या वादावरून पतीने पत्नीसह सख्या मुलावर कुऱ्हाडीने आणि विळ्याने हल्ला करुन गंभीररित्या जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून आपल्या मुलासह पळ काढला. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा सर्व थरारक प्रकार सहा वर्षाच्या मुलीसमोर घडला आहे.
रामप्रसाद उर्फ बंडु महादेव गिरी व विजयमाला महादेव गिरी अशी जखमींची नावे आहेत. महादेव यांना दोन पत्नी असून त्यांना तीन अपत्ये आहेत. महादेव हे आपल्या दुसऱ्या पत्नीसमवेत म्हाळसगाव येथे वास्तव्यास राहतात. तर दुसरी पत्नी विजयमाला या आपला मुलगा रामप्रसाद यांच्या समवेत भांडेगाव येथे राहतात. त्यांच्याकडे एकूण बारा एकर शेती असून महादेव ज्या पत्नीसोबत राहतात. त्या पत्नीची मुले सदरील संपुर्ण शेती आमची असल्याचा दावा करत आहेत. हा वाद मागील तीन ते चार वर्षापासुन सुरू आहे. तर भांडेगाव येथे वास्तव्यास असलेल्या रामप्रसाद याने माझ्या वाट्याला येईल ती घेण्यास तयार दर्शवली. त्याने अनेकदा आपल्या वडीलाकडे तसे सांगितले होते. मात्र, रविवारी वडील आणि दोन सावत्र भाऊ अचानक शेतामध्ये आले आणि त्यांनी रामप्रसाद व विजयमाला यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर या दोघांवर कुऱ्हाड व विळ्याने सपासप वार करुन जखमी केले. टोकदार विळाच रामप्रसादच्या पोटामध्ये भोसकला असून विजयमाला यांच्या पायावरही कुऱ्हाडीचे जबर वार करुन त्यांना जखमी केले. या घटनेत दोघे माय-लेक गंभीर जखमी झाले.
दरम्यान, जखमींनी आरडाओरड केल्याने परिसरात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत त्यांना उपचारासाठी हलविले. सध्या जखमीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील रामप्रसाद यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रेफर केले जाणार असल्याचे डॉक्टराने सांगितले. हा प्रकार रामप्रसाद यांच्या चैतन्या नावाच्या मुलीने डोळ्यासमोर पाहिल्यामुळे ती ओक्साबोक्सी रडत सदरील घटना सांगत होती. सहा वर्षीय बालिका चैतन्या घाबरुन गेली असून याप्रकरणी उशिरापर्यंत पोलीसात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

























































