बायको महिन्यातून दोनच वेळा घरी येते, नवऱ्याची कोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपली पत्नी महिन्यातून फक्त दोनच वेळा आपल्याला भेटते, असा दावा करून एका महिलेच्या पतीने कुटुंब न्यायालयात धाव घेतली होती. त्याविरोधात महिलेने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

महिलेने दाखल केलेल्या याचिकेनुसार, तिच्या नवऱ्याने गेल्यावर्षी सूरत येथील कुटुंब न्यायालयात धाव घेतली होती. आपली पत्नी आपल्यासोबत राहत नाही. मुलाच्या जन्मानंतर ती नोकरीच्या बहाण्याने आपल्या माहेरी राहते. ती महिन्यातून फक्त दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्याच्या अखेरीला त्याला भेटायला येते. आपल्या मुलाच्या प्रकृतीकडे आणि वैवाहिक कर्तव्यांकडे दुर्लक्ष करून ती आपली नोकरी कायम ठेवत आहे, असा दावा पतीने केला आहे.

तर महिलेने आपण नियमितपणे दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्याअखेरीला नवऱ्याला भेटायला जात असून ही वैवाहिक कर्तव्यांची पूर्तता आहे की नाही हे न्यायालयानेच सांगावं असं म्हणत गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.