अपात्रतेसंदर्भात कारवाईआधी विधानसभा अध्यक्षांना दिल्लीत यावं लागत असेल तर शंकांना बळ मिळतं! संजय राऊत यांनी फटकारलं

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कारवाईला सुरुवात करा असे स्पष्ट निर्देश मिळाल्यानंतर राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. यातून राज्यातील विरोधकांच्या शंकांनाच बळ मिळते अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. राजधानी दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

‘विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घ्यावा यासाठी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात यावं लागलं असेल तर आमच्या मनात ज्या शंकांना बळ मिळतं आहे. एकतर अनेक महिने हा घटानात्मक पेच त्यांनी वाढवून ठेवला आहे’, असं संजय राऊत म्हणाले.

‘सर्वोच्च न्यायालया निकाल आणि निर्णय स्पष्ट असताना त्यांनी फक्त वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं आणि आठ दिवसात तुम्ही कारवाईला सुरुवात करा असे स्पष्ट निर्देश असताना त्यांचं वेळकाढूपणाचं धोरण संपलं नसेल तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रात मान दिला जात नाही, विधानसभेचे अध्यक्ष त्यांचा सन्मान करत नाही’, असा गंभीर आरोप राऊत यांनी यावेळी केला.

न्यायालयानं सांगितलं आहे की आम्ही तुमचा आदर केला, तुम्हीही आमचा आदर करा. हा न्यायालयाच्या मनाचा मोठेपणा असल्याचंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.