मेट्रो स्थानकात जास्त वेळ रेंगाळल्यास खिशाला चाट लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्य प्रवाशांसाठी आजपासून सुरू झालेल्या मेट्रो मार्गावरील स्थानकांमध्ये जास्त वेळ रेंगाळत राहिल्यास प्रवाशांच्या खिशाला चाट लागणार आहे. प्रवाशाने तिकीट घेतल्यानंतर एका तासाच्या आत प्रवास सुरू करणे बंधनकारक आहे. मात्र एखाद्या प्रवाशाला तिकीट घेतलेल्या स्थानकातून बाहेर पडायचे असेल तर त्याला अवघ्या 20 मिनिटांत बाहेर पडावे लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वेळ स्थानकात रेंगाळत रहिल्यास संबंधित प्रवाशाला 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत दंडाचा दणका बसणार आहे.

अंधेरी (पश्चिम)- दहिसर-गुंदवली दरम्यानच्या मेट्रो 2 अ आणि 7 या मेट्रो मार्गावर 30 वातानुकूलित स्थानके आहे. या स्थानकांमध्ये प्रवाशांनी नाहक गर्दी करून राहू नये, गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे म्हणून मेट्रो प्रशासनाने प्रत्येक स्थानकात नियमावलीचे फलक लावले आहेत. त्यामध्ये प्रवाशाने तिकीट घेतल्यानंतर एका तासात प्रवास सुरू करावा. तसेच जे प्रवासी आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी स्थानकात आले असतील किंवा ज्यांना प्रवास करायचा नाही त्यांना सदरच्या स्थानकातून 20 मिनिटात बाहेर पडावे लागणार आहे.