द कश्मीर फाईल्स हा अतिशय बीभत्स आणि प्रचारकी चित्रपट, इफ्फीतील ज्यूरींची टीका

गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीची सोमवारी सांगता झाली. या महोत्सवात विविध चित्रपट प्रदर्शित झाले. अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सांगता समारोहाच्या वेळी अनेक कलाकारांनी आपलं मनोगत व्यक्त करताना एकूणच चित्रपटसृष्टीविषयी विचार मांडले.

या महोत्सवात ज्यूरी असलेले इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटावर टीका केली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. सुमारे 300 कोटींहून अधिकची कमाई देखील या चित्रपटाने केली. पण, त्यासोबत या चित्रपटामुळे अनेक वादही निर्माण झाले.

त्यातच लॅपिड यांनी हा चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणं अयोग्य असल्याचं रोखठोक मत मांडलं आहे. ते म्हणाले की, या महोत्सवात 15वा चित्रपट द कश्मीर फाईल्स पाहून आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूप अस्वस्थ झालो. आमच्या मते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचारकी पद्धतीचा आणि बीभत्स चित्रपट आहे. इतक्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे, असं लॅपिड म्हणाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना टॅग करून यावर व्यक्त होण्याची विनंती केली आहे.