इम्रान खान पाच वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका दिला आहे. इम्रान खान यांना तोषखाना प्रकरणात पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले असून संसदेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या समर्थकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन करत निदर्शने केली. त्यांना हटविण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांवरही इम्रान समर्थकांनी गोळीबार केला.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर इतर राष्ट्रांचे प्रमुख आणि परदेशी मान्यवरांकडून मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीररीत्या विक्री केल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी निवडणूक आयोगाकडे ऑगस्टमध्ये तक्रार दाखल केली होती. पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान रजा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या खंडपीठाने तोषखाना प्रकरणात इम्रान खान यांना दोषी ठरवत पाच वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र घोषित केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे  पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) नेते फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.