एसी बंद, प्रचंड उकाडा, डास…नाटय़गृहातील गैरसोयींविरोधात वैभव मांगले यांनी उठवला आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटय़गृहातील दुरवस्थेबाबत कलाकार आणि प्रेक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबद्दल अनेकदा तक्रारीही केल्या जातात. अभिनेता वैभव मांगले यांनी आज नाटय़गृहातील गैरसोयींबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहून संताप व्यक्त केला. एसी बंद, प्रचंड उकाडा, त्यात डास… सांगा कुणाकडे दाद मागायची, असा सवाल त्यांनी केला.

वैभव मांगले यांच्या ‘संज्या-छाया’ नाटकाचे राज्यभर प्रयोग होत आहेत. एसी नसलेल्या नाटय़गृहांमध्ये भर उन्हाळ्यात उकाडय़ामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला. याबाबत  वैभव यांनी लिहिलंय, ‘पुणे, संभाजीनगर, नाशिक येथे ‘संज्या छाया’चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढय़ा प्रकाशात काम करताना प्रचंड उकाडय़ात अतोनात त्रास झाला.’

त्यांनी पुढे म्हटलंय, ‘डास आणि प्रचंड उकाडय़ात प्रेक्षक  पुणे तसेच कोथरूड येथे प्रयोग पाहत होते. एक मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले. पण आपण ‘शो मस्ट गो ऑन’वाले लोक. आम्ही विनंती केली की आम्हालाही त्रास होतोच आहे. इथे येईपर्यंत माहीत नव्हतं की एसी नाहीय. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 मे चे शो रद्द केले. ‘कालिदास’ला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. काय बोलावं या सगळ्यावर…

नाटय़गृहातील या गैरसोयींबाबत वैभव मांगले यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. मांगलेंच्या पोस्टवर कमेंट करत अनेक प्रेक्षकांनी देखील त्यांना ठिकठिकाणी आलेले अनुभव सांगितले आहेत.