#NZvIND रोहितच्या ‘दुहेरी’ शतकावर सर्वांच्या नजरा, संस्मरणीय खेळीची अपेक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दुहेरी शतकं झळकावण्यात मास्टर डिग्री मिळवलेला ‘हिटमॅन’ रोहित शर्मासाठी उद्याचा दिवस खास असणार आहे. कारण न्यूझीलंडविरुद्ध रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उद्या आणखी एक दुहेरी शतक झळकावणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी होणारा एक दिवसीय सामना रोहितचा दोनशेवा एक दिवसीय सामना असेल. हा सामना संस्मरणीय करण्यासाठी रोहित नक्की मोठी खेळी साकारत संघाला विजय मिळवून देईल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

पृथ्वी शॉनंतर गिल मैदान गाजवणार; न्यूझीलंडविरुद्ध मिळणार संधी, विराटचा इशारा

विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने चौथ्या आणि पाचव्या एक दिवसीय सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करेल. टीम इंडियाने याआधी पहिले तिन्ही सामने जिंकत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दोनशेव्या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या रोहितची नजर मालिकेतील सलग चौथ्या विजयावर असेल.

.. तर होणार विक्रम
सेडल पार्कवर होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यास गेल्या 52 वर्षात न्यूझीलंडमध्ये क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये मोठ्या फरकाने मालिका विजय मिळवण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा होईल. न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाने सर्वात प्रथम 1967 ला सामना खेळला होता. त्यानंतर एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ असेल.

शमीला आराम, गिलला संधी
पहिल्या तीन सामन्यात वेगवान गोलंदाजीने यजमानांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणाऱ्या शमीला उद्याच्या सामन्यात आराम दिला जाण्याची शक्यता आहे. शमीने तीनपैकी दोन सामन्यात सामनावीरचा पुरस्कार मिळवत वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तरुण खेळाडू शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. गिलच्या फलंदाजीचे कौतुक करत विराटने याआधीच त्याला संधी मिळेल असा इशारा दिला होता.