
सामना प्रतिनिधी । कोलकाता
हिंदुस्थानच्या दौर्यावर असलेल्या वेस्ट इंडीजला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत धुळ चारल्यानंतर ‘टीम इंडिया’ आता तीच करामत टी-20 मालिकेतही करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांच्या अनुपस्थितीत टी-20तील सर्वात धोकादायक संघ असलेल्या विंडीजविरूद्ध ‘टीम इंडिया’चा खरा कस लागणार आहे. विराट आणि माहीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या हिंदुस्थानी संघाला कडवी टक्कर देण्यासाठी विंडीजचा संघही तयार झाला आहे.
विराट कोहलीला तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली असून, महेंद्रसिंग धोनीला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. या प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत रोहित शर्मा ‘टीम इंडिया’चे नेतृत्व कसे करतो, याकडे सर्वांच्या नजरा असतील. कार्लोस ब्रेथवेटच्या नेतृत्वाखालील कॅरेबियन संघाला टी-20 क्रिकेटमध्ये हरविणे हिंदुस्थानसाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.
पाहुण्यांचे पारडे जड
कसोटी आणि वन डे मालिकेत स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत खेळलेल्या विंडीजच्या टी-20 संघात डॅरेन ब्राव्हो, कायरोन पोलार्ड व आंद्रे रस्सेल या दिग्गज खेळाडूंनी कमबॅक केले आहे. शिवाय विंडीजने मागील चार टी-20 सामन्यात हिंदुस्थानचा पराभव केलेला आहे. उभय संघांमध्ये 2009 ते 2017 दरम्यान 8 टी-20 लढती झाल्या असून, पैकी 5 लढती विंडीजने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणार्या टी-20 मालिकेतही हिंदुस्थानविरुद्ध विंडीजचे पारडे जड असेल.
लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी
विराट कोहलीच्या गैरहजेरीत ‘आयपीएल’फेम लोकेश राहुलला टी-20 संघात स्थान मिळाले असून, महेंद्रसिंग धोनीच्या जागेवर रिषभ पंत यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळेल. मधल्या फळीत दिनेश कार्तिकाला भूमिका बजवावी लागणार आहे. भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह या वेगवान जोडगोळीच्या साथीला नव्या दमाचा खलील अहमद असेल, तर युझवेंद्र चहल व कुलदीप यादव फिरकीची जबाबदारी सांभाळतील. कर्णधार रोहित शर्माने ज्या ईडन गार्डनवर 2014साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 264 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती, त्याच लकी मैदानावर उद्या त्याच्यावर ‘टीम इंडिया’ची खर्या अर्थाने मदार असेल.




























































