
सामना ऑनलाईन । मँचेस्टर
विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने बहुचर्चित इंग्लंड दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात केली. हिंदुस्थानने सलामीच्या टी-२० क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडवर ८ गडी आणि १० चेंडू राखून विजयी सलामी दिली. विजयाचा हीरो ठरलेला डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने निम्मा संघ गारद करून इंग्लंडची फिरकी घेतली. त्यानंतर लोकेश राहुलने नाबाद शतकी खेळी साकारून हिंदुस्थानला सहज विजयापर्यंत पोहोचविले. याचबरोबर हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
इंग्लंडकडून मिळालेले १६० धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने १८.२ षटकांत २ बाद १६३ धावा करून पूर्ण केले. खरे तर डेव्हिड विलीने पाचव्याच चेंडूवर शिखर धवनचा (४) त्रिफळा उडवला होता, मात्र त्याच्या जागेवर आलेला लोकेश राहुल (नाबाद १०१) आणि दुसरा आघाडीवीर रोहित शर्मा (३२) यांनी दुसऱया गडय़ासाठी १२३ धावांची भागीदारी करून सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला. लोकेश राहुलने ‘आयपीएल’मधील खेळाचीच पुनरावृत्ती केली. त्याची खेळपट्टीवरील देहबोली आणि ती बिनधास्त फटकेबाजी लाजवाब ठरली. ५४ चेंडूंत ठोकलेल्या राहुलच्या नाबाद शतकी खेळीला ५ टोलेजंग षटकार व १० सणसणीत चौकारांचा साज होता. राहुलला स्ट्राइक देणाऱया रोहित शर्माने ३० चेंडूंत ३२ धावा करताना एका षटकारासह ३ चौकार लगावले. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने नाबाद २० धावांची खेळी करीत राहुलला साथ दिली. त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ८ बाद १५९ अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. कुलदीप यादवने ऍलेक्स हेल्स (८), कर्णधार इयॉन मोर्गन (७), जॉनी बेयरस्टो (०), जो रूट (०) यांच्यासह स्थिरावलेला बटलर असे महत्त्वाचे ५ फलंदाज बाद केले.
‘कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली. आता मालिका वाचविण्यासाठी उर्वरित लढतीत आम्हाला हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजाविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. कुलदीपने चार चेंडूंत ३ फलंदाज बाद करून आमच्या हातातून सामना हिरावून नेला. चांगल्या सुरुवातीनंतरही मधली फळी कोलमडल्याने आमच्या ३० ते ४० धावा कमी झाल्या. शिवाय लोकेश राहुलने ज्या सहज पद्धतीने फलंदाजी केली, ते बघता हिंदुस्थान नक्कीच विजयाचे हक्कदार होता.’
-इयॉन मॉर्गन
‘माझ्या गोलंदाजीवर फलंदाजाने षटकार ठोकला तरी मी घाबरत नाही की विचलित होत नाही. दबाव घ्यायचाच नाही ही गोष्ट मी लहानपणीच शिकलो. धावा किती जातात यापेक्षा अचूक गोलंदाजी करण्यावर माझा भर असतो. बळी पाहिजे असेल तर फिरकी गोलंदाजाला चेंडू वळविता आलेच पाहिजे. मी फक्त गोलंदाजीच्या बेसिकवर लक्ष दिले.
– कुलदीप यादव



























































